अमेरिकेत अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्यासाठी ट्रम्प उचलणार पावले

DONALD TRUMP ON ECONOMY

वॉशिंग्टन :- कोरोनाच्या जागतिक साथीमुळे मोठे आर्थिक नुकसान झेलणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला  पुनर्जीवित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शविला आहे. सध्या देशातील ९५ टक्के लोक  घरातच बसून आहेत. १ मेपर्यंत सामाजिक अंतरासह इतर कठोर पावले उचलण्यात आली आहेत. हे सर्व १ मेनंतरही सुरू राहू शकते, असे संकेत ट्रम्प यांनी गुरुवारी दिले; परंतु अर्थव्यवस्थेला टप्प्याटप्प्याने पुनर्जीवित करण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

काही अंदाजानुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये २६ दशलक्ष अमेरिकन लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केले आहेत आणि ही संख्या लवकरच चार कोटींचा आकडा ओलांडू शकते. सन २०२० मध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी अमेरिकेत विकास दरवाढीवर ब्रेक लागण्याचा अंदाज वर्तवला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊस येथे आपल्या नियमित पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिकेला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची गरज आहे. स्वच्छता चांगल्या पद्धतीने ठेवून, सामाजिक अंतर निर्माण करून आणि चेहरा झाकून आपण ही लढाई जिंकू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपली अर्थव्यवस्था सुरक्षित आणि टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यास प्रोत्साहित केले जाईल; परंतु याचा अर्थ असा नाही की, आम्ही कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करणार नाही. आपल्या देशाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सतत खबरदारी घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, २३ राज्यांत  कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट आली आहे. ४६ राज्यांमध्ये कोरोना व्हायरससारखी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष माईक पेंस यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार न्यूयॉर्क मेट्रो क्षेत्र, न्यू जर्सी, कनेक्टिकट, डेट्रॉईट आणि न्यू ऑर्लीयन्समध्ये आशेचे किरण दिसत आहेत. पेंस कोरोना व्हायरसवरील व्हाईट हाऊस टास्क फोर्सचे नेतृत्व करीत आहेत. ते म्हणाले की, १६ राज्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे.


Web Title : Trump favours phased reopening of economy

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)