संत तुकाराम आणि जिजाऊ माताच शिवरायांचे खरे गुरू : छत्रपती संभाजीराजे भोसले

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे छत्रपती शिवरायांचे गुरू हे स्वामी रामदास हे होऊच शकत नसल्याचे विधान केले होते. त्यावर आता खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भाष्य केले आहे . शिवरायांचे खरे गुरू हे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब याच आहेत, असे ते म्हणाले . वढू बद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४० वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी खासदार संभाजी महाराज यांनी संवाद साधला .

नरेंद्र मोदींची तुलना केलेल्या वादग्रस्त पुस्तकाचा महाराष्ट्रात सर्वांत आधी निषेध केलेला आहे. दोन दिवसांपासून राज्यातील वातावरण मलीन झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज, फुले, आंबेडकर, संत तुकाराम महाराज, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा राज्यात पुस्तकावर चर्चा सोडून दुसरीकडेच चर्चा गेली आहे. महाराष्ट्र वेगळे राज्य असून इतर राज्यांना आदर्श देण्याची आवश्यकता आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या छत्रपती घराण्याच्या वंशजासंदर्भात पुरावे मागितले. भोसले यांनी छत्रपतींच्या घराण्याबद्दल काय पुरावे द्यायचे? आमचे छत्रपतींचे घराणे आहे. तोंडात येईल ते काही बोलून चालत नाही. राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नये, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.