खरे स्वातंत्र्य : स्वतःच्या मानसिकतेतून !

True freedom

तृप्ती सगळ्या जावांमधून सगळ्यांत धाकटी. नुकतंच तिच्या एका पुतण्याचं लग्न झालं. तृप्तीकडेही सासूची पदवी ओघानेच आली. अर्थात वयातील अंतर कमी असल्याने नवीन सुनेशी तिची छान मैत्री जमली. मग तिच्याबरोबर खरेदी कर, कधी नवीन हेअर स्टाईल कर. असे करताना तृप्तीला खूप गंमत वाटायची. सहवासातून आणि निरीक्षणातून तृप्तीला लक्षात येत होतं, की ही मुलगी एवढी नवीन असून किती मनमोकळी आणि बिनधास्त आहे. स्वतःच्या आवडीनिवडी, अगदी खाण्याच्या पदार्थांपासून मोकळेपणी सांगते. सगळ्यांमध्ये मस्त वावरते, अजिबात बुजत नाही ! सुटी संपत आल्याने ती आपल्या घरच्यांबरोबर मूळ गावी परत निघाली. वाटेतही तिचे विचार थांबले नव्हते. उलट नवीन सुनेचा खूप अभिमान वाटत होता .

मात्र एकीकडे कुठे तरी ती स्वतःला मूर्ख समजत होती . ती विचार करू लागली ,अजूनही मला स्वतःला माझ्या आवडीनिवडी जपायला संकोच वाटतो , स्वतःसाठी वेळ काढताना घराकडे ,नवऱ्याकडे दुर्लक्ष होत नाही ना?असंच वाटत राहतं .बाहेरून आल्यावर थोडा जरी उशीर झाला तरी सासू-सासर्‍यांची जेवणाची वेळ टळू नये म्हणून जीव घाबरतो. उशीर झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी तिच्या नजरेतून सुटलेली नसते. बरेचदा हे तिला बंधनकारकही वाटते. पण खरंच तृप्तीसारख्या महिला बंधनात आहेत असं म्हणता येईल का ? हे खरंच परिस्थितीने त्यांच्यावर लादले गेलेले आहे का? की यात काही त्यांच्या मानसिकतेचाही भाग असतो? हा अपराधीपणाचा भाव का त्या सतत बाळगत असतात? त्यासाठी त्यांना कोणी भरीस पाडत असेल की त्यांचे भावनिक परावलंबन त्यांना सगळ्यांना खूश ठेवण्यास भाग पाडते? वाचकांनो, तृप्तीसारखीच स्थिती (काही अपवाद वगळता ) आज जवळपास सर्वसाधारण सगळ्या तिशी- पस्तिशीनंतरच्या महिलांची होते आहे.

सुदैवाने आजच्या तरुण जनरेशनमध्ये याबाबत सकारात्मक बदल झाला आहे. प्रत्येक स्त्री सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे सतत स्वतःला अपराधी समजत असते. अगदी छोट्या छोट्या चुकाही याला अपवाद नसतात. मुलांच्या शाळेच्या वेळी उठायला उशीर झाला तर तो झालाच कसा? “कृष्णअष्टमीचा दिवस आला आणि माझा प्रसादाचा सुंठवडा तयार नाही म्हणजे काय?” अशा छोट्या चुका पण तिला अस्वस्थ करतात. एखादी गोष्ट करायची राहिली ,उदाहरणार्थ चार दिवस झाले नवरा सांगतो आहे शर्टला शिवण घालायची राहिली असणे असो की मित्राच्या मुलाला यश मिळाल्याने त्यांना नाश्त्याला बोलवायचे राहून जाणे असो ! “किती लक्ष राहात नाही माझं ! कामाचा उरकच पडत नाही मला!” अगदी चुकीचे विचारही मनात आले तरीही, लगेच स्वतःवर दोषारोप होतात. शैलाच्या मैत्रिणींची ट्रिप जाणार होती. तिचे सासू-सासरे बरेच वयाचे आहेत.

त्यांना आता घरात एकटं सोडून बाहेर जाता येत नाही. बरेचदा तिला वाटतं यांना दिरांनी थोड्या दिवसांसाठी त्यांच्याकडे न्यावं; पण त्याच क्षणाला तिला स्वतःचा रागही येतो, “किती स्वार्थी आहोत आपण !आपली जबाबदारी टाळण्याचा विचार मनात येतो तरी कसा !” असं तिला वाटतं. सारिकाची मुले शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त बाहेर असतात . नवऱ्याला व्यवसायानिमित्त भरपूर प्रवास करावा लागतो . अशा वेळी घरी सासू-सासरे आणि ती! सगळ्यांसाठी व्यवस्थित जेवण ती बनवते. पण नेहमीच तेच ते खाऊन कंटाळते. जाता-येता दिसणारी चाट भांडारे तिला खुणावतात. “पण असं एकटीच जाऊन गाडीवर कशी काय खाऊ ?” या विचाराने तिला अपराधी वाटतं. सध्या सुरू असलेल्या, ‘आई कुठे काय करते?’ ह्या वेब सिरीजमधील एका प्रसंगात, आई रात्री सगळ्यांसाठी एकेकाला आठवून बदाम भिजत टाकते. पण यात स्वतःसाठी मात्र टाकत नाही .

मला काही त्याची गरज नाही असा विचार करते. प्रत्यक्षात खरंच असे संस्कार मोठ्या प्रमाणात तिच्यावर केले जातात. सगळ्या गरजांमध्ये स्वतःचा क्रम सगळ्यात शेवटी. मग ती गरम पोळी असो ही सुकामेवा, दूध, दही, फळे असो. घरातल्या वृद्ध आणि मुले यांच्यासाठी ते असतात असा तिचा गोड (?) गैरसमज. परवा मीनलने पोळ्या करत असताना सगळ्यात शेवटची पोळी स्वतःसाठी गरम करून त्यावर तूप-मीठ टाकून घेतली .पण तिने उभ्या उभ्याच ,खूप घाईने तोंडात कोंबली. कुणी बघितलं तर काय म्हणेल या अपराधी भावनेने. खरे तर आज कुठल्याच घरामधून साधारण असा विचार केल्या जातही नाही. पण आता संस्कार आडवे येतात.

याला आर्थिक स्वतंत्रता असणारी स्त्री पण अपवाद नाही. ऑफिसमधून जाता-येताना घरी नेण्यासाठी वस्तूंच्या पिशव्या ती भरून घेते .खरेदी करताना सगळ्यांची आवड लक्षात घे. पण तिला मात्र सगळंच काही आवडत असतं, काहीही चालतं .उरलेले संपवण्यात ती नेहमी आघाडीवर! नकळत आपल्या पोटाचं गोदाम नाही तर डस्टबिन करून घेते. हा संकोच तिला पुढील आयुष्यात त्रास देतो. पुन्हा दिवसभर बाहेर राहिल्याने मुलांना, सासू-सासर्‍यांना, नवऱ्याला आपण वेळ देऊ शकत नाही, याचा कायम अपराधीभाव तिच्या मनात येतो .

यावर मात करण्यासाठी ती वारंवार दिलगिरी व्यक्त करते, चुकांचे ओझे मनावर वाहते. स्वतःलाच काही तरी कमी समजून त्याची अनेक गोष्टींमधून परतफेड करण्याचा प्रयत्न करते. सुहासला अधूनमधून ‘वर्टिगो’चा अटॅक येतो . त्यामुळे तिच्या घरातल्या कामावर, कर्तव्य, जबाबदारी निभावण्यावर परिणाम होतो. त्यामुळे तिला एवढं अपराधी वाटतं , की केविलवाणेपणाने सतत माफी मागत राहते . या ताणातून परत वर्टिगोला कारण मिळते. नीलिमा ताईंना ‘मेनोपॉज’चा त्रास होतो. सगळे समजूनही घेतात पण तरीही सतत काहीतरी दुखते ,असं नवऱ्याला सांगताना त्यांना अपराधी वाटते.

एवढंच काय, एखादी गोष्ट दुसऱ्यांकडे नाही आणि आपल्याकडे आहे. म्हणूनही त्यांना अपराधी वाटतं. मीनाच्या आईने तिला दोन सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. पण सासर घरी अडचणी, शेतीवर आधारित एकत्र कुटुंब आणि दुष्काळाचा काळ. अशा परिस्थितीत मोठ्या जावेच्या हातात बांगड्या नाही आणि मीच कशी एकटी बांगड्या घालू? म्हणून तिने त्या काढून ठेवल्या. हाताला कधी लावल्याच नाही. या अपराधी भावना पुरुषांमध्ये असतात,नाही असं नाही! त्यांनाही ही भावना तितकीच त्रास देऊ शकते . पण या भावनेमागचं महत्त्वाचं कारण असतं, नीरक्षीरविवेक आणि विशेषतः अति संवेदनशीलता. हे गुण स्त्रियांकडे विशेषत्वाने असतात. याला मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर होणारे संस्कार ! ते घरातून एवढे रुजलेले असतात की स्वतःकडे दुय्यम स्थान घेणे ,स्वतःला त्यागमूर्ती बनवणे ,स्वतःच्या चुकांबाबत सतर्क राहणे या गोष्टी त्या नकळत करत जातात आणि त्यातूनच आत्मनिर्भस्यता, न्यूनगंड, सतत शिक्षा भोगणे, एक ओझं मनावर बाळगत राहणे , यातच त्या गुरफटत जातात आणि मानसिक आरोग्याचे खूप नुकसान करून घेतात.

कशाचाही अतिरेक वाईटच! याऐवजी त्यांनी १) सारासार विवेकबुद्धी वापरली . माझ्याकडून एक-दोन चुका झाल्या म्हणजे मी पूर्ण किंवा माझे पूर्ण व्यक्तिमत्त्व दोषी आहे असं ‘ओव्हर जनरलायझेशन’ करण्याच्या विचारातील चुका टाळल्या तर यातून बाहेर पडायला मदत होते. २) मीही एक व्यक्ती आहे, माझ्याकडून काही चुका होऊ शकतात. मी सर्वांग परिपूर्ण असलंच पाहिजे असा ‘च’चा अट्टहास सोडला तर यातून बाहेर पडणं सोपं होईल . ३) स्वतःवर कायम दोषारोपणाचा टप्पा मारण्यापेक्षा मनाच्या पोलिसाला थोडं शांत बसायला सांगावं आणि आयुष्य एन्जॉय करायला सुरुवात करायला पाहिजे. ४) मुळातच ज्यांचा नीरक्षीरविवेक चांगला असतो तिथे चुकांची परत होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे स्वतःच्या चुकांबाबत अति सतर्क राहण्याची गरज नाही. विशेषतः स्त्रीस्वातंत्र्यासाठी प्रयत्न करताना मला वाटतं प्रत्येकीने सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या मानसिकतेवर आणि भावनिक परावलंबित्वावर जास्त प्राथमिकतेने काम करायला हवे. स्वतःच्या मनोवृत्तीतील बदल स्वातंत्र्याचा अनुभव आपोआप देईल.

मानसी फडके
एम ए मानसशास्त्र,
एम. एस. समुपदेशन आणि सायको थेरपी
एम .ए. मराठी.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER