टीआरपी पर्दाफाश, पिक्चर अभी बाकी है…

Shailendra Paranjapeआंतरराष्ट्रीय टपाल दिनी टीआरपी रँकेटचा पर्दाफाश अशी बातमी आली आणि गंमत वाटली. लहानपणी डाकिया डाक लाया, गाणं ऐकायचो, शाळेतही पत्रलेखन शिकवले जायचे. शेजारच्या बाकावर बसणाऱ्या मित्राला पत्र लिहायचे, त्याचा पत्ता टाकायचा आणि मग परस्परांना पत्र मिळाले की मजा वाटायची. हळू हळू तंत्रज्ञानातल्या बदलांनी सारं अवकाशच बदलून टाकलं. आधी टीव्ही मग संगणक आले, रंगीत मॉनिटर, मग डेस्क़टॉप फ्लँट झाले. मोबाइलनं तर क्रांतीच केली. छोट्याश्या हाताच्या पंजात सारं जग सामावू लागलंय. त्यातून आमचा पोस्टमन, डाकिया कुठं हरवून गेला समजलंच नाही.

अर्थात, हे सारं आमचं टिपिकल शहरी जाणिवांचं जग. खेडोपाडी ही सारी प्रगती सुरुवातीला हळू पोहोचली पण आता मोबाइलनं खऱ्या अर्थानं सगळ्या भिंती पाडल्यात. माहिती वेगाने पसरू लागली. मग सोशल मिडिया नावाचा आक्राळ विक्राळ प्रकार आलाय. त्यानं अक्षरशः जगणं पूर्णांशानं बदलून टाकलंय.

माणसं, सकाळी दात घासायच्याही आधी ग्रुपवर काय पडलंय ते बघू लागलीत. व्हाट्स अप विद्यापीठानं अनेक विषयातले तज्ज्ञ विद्युतवेगानं निर्माण केलेत. त्यामुळेच मग एकीकडं आंतरराष्ट्रीय टपाल दिन नावाचा एक प्रकार २२ देशांनी मिळून सुरू केला होता, हे फक्त एका नोंदीपुरतंच उरतं. रोजच्या वर्तमानपत्रांच्या, आकाशवाणीच्या दिनविशेषपुरता आणि रेडिओवरच्या गाण्यांपुरताच टपाल दिन उरलाय असं नाही तर व्हाट्स अपवर टपाल दिनानिमित्त जुन्या टपाल पेट्यांचे फोटो शेअर लाइक होऊ लागलेत. लोक टपाल दिनाचं असंही स्मरणरंजन करू लागलेत.

टपाल दिनाच्या निमित्ताने मग चिठ्ठी आयी है, डाकिया डाक लाया, हमने सनम को खत लिखा…सारखी गाणी ऐकायला मिळाली. पण त्या सर्वांपेक्षा ही टीआरपीचा पर्दाफाश बातमी जास्ती लक्षात राहिली. कारण…कारण कुठल्याही गोष्टीचा पर्दाफाश म्हटलं की माणसाचं लक्ष जातंच. भानगड कुणाची का असेना, कुतूहल हे असतंच. त्यात जातीनं, मुंबईच्या पोलीस प्रमुखांनी त्यात रस घेऊन कशी आम्ही कामगिरी केलीय, हे सांगितल्यानं हे काही तरी लै भारी असणार, अशीच धारणा होते ना…

ते टीआरपी का काय आहे ना ते कसं बघतात, हेही काही वृत्तपत्रात वाचून समजलं. मग अख्ख्या महाराष्ट्रात आठ हजार पीपल मीटर का काय ते बसवलेत आणि मुंबईत दोन हजार बसवलेत असंही बातम्यांमधून सांगितलं गेलं, वाचनात आलं. टीव्हीवाल्यांच्या ग्राफिक्समधेही दिसल्याचं काही मित्रांनी सांगितलं.

राज्याच्या बारा तेरा कोटी

लोकसंख्येसाठी म्हणजे साधारण दोन ते तीन कोटी घरांपैकी आठ हजार घरात हे मीटर बसवून तो टीआरपी ठरतो. त्यातून जाहिराती मिळतात, हे जरा अनाकलनीयच आहे. मुळात ये पब्लिक है ये सब जानती है, हे विसरू नये आणि जाहिरातदारही केवळ आणि केवळ टीआरपी बघून जाहिराती देत नाहीत तर एकदा दिल्यावर जो काही प्रतिसाद येतो, तो अनुभवही ते लक्षात घेतातच. मुळात व्यापाऱ्यांना फसवणं वाहिन्यावाल्यांना शक्य आहे, हे गृहीतकच फसवं आहे. दोन तीन वाहिन्या काही गैरप्रकारात सामील असतील, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. चौकशी करावी हे ठीक आहे. पण नेमकी विशिष्ट वाहिनी त्यात आढळल्याचं सांगण्यात येतं तेव्हा मनात शंका येते बुवा.

म्हणूनच मग हा पर्दाफाश म्हणजे निव्वळ महाराष्ट्रात चाललेल्या सुशांतसिंह प्रकरणाचा, अभिनेत्री की नटी की स्टार कंगना विरुद्ध विशिष्ट पक्षाचे नेते, या साऱ्या लढाईचा पुढचा टप्पा आहे की काय, अशी शंका येऊ लागली. हा पर्दाफाश म्हणजे सुशांतसिंह प्रकरणाच्या चित्रपटाचा मध्यंतराचा शॉट नाही ना, याचा विचार करायला हरकत नाही. पॉपकार्न खाऊन घ्या, चहा प्या आणि पुन्हा अंधारात आपापल्या सीटवर जाऊन बसा…पिक्चर अभी बाकी है…

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER