त्रिफळा – अनेक व्याधींचे त्रिफळा उडविणारे एक औषध !

Triphala

त्रिफळा चूर्ण हे अनेकांच्या परीचयाचे औषध आहे. पोट साफ करणारे चूर्ण असा त्रिफळा चूर्णाचा उपयोग प्रसिद्ध आहे. परंतु या व्यतिरीक्त त्रिफळा अनेक व्याधींना दूर करणारे, व्याधी होऊ न देणारे, रसायन औषध आहे.

त्रिफळा या नावावरूनच लक्षात येईल की यात तीन फळ वापरली आहेत. हे तीन फळं कोणती तर हिरडा, बेहडा, आवळा. या तीन वनस्पतीच्या फळांचा वापर त्रिफळामधे करण्यात येतो. या तीन वनस्पतींची वैशिष्ट्ये काय आहेत –

हिरडा – म्हणजेच हरीतकी, यात षडरसांपैकी ५ रस असतात. मधुर अम्ल कटू तिक्त कषाय हे पाचही रस फक्त लवण रस यात नसतो. पचायला हलके, जठराग्नि वाढविणारे, भोजन पचयला मदत करणारे, पोट साफ करणारे आहे. याशिवाय बुद्धीवर्धक, दीर्घायु देणारे आहे. कुष्ठ ज्वर पाण्डु यक्ष्मा स्थौल्य अर्श अशा कितीतरी व्याधींवर औषध स्वरूपात उपयुक्त आहे.

हरीतकीची प्रशंसा करतांना म्हटले आहे की, ” हरीतकी मनुष्याणां मातेव हितकारिणी कदाचित कुप्यति माता न उदरस्था हरीतकी ।” अर्थात हरीतकी मनुष्यांकरीता आईप्रमाणे हितकारक आहे. आई एखादेवेळी बालकावर रुष्ट ( रागवू) शकते पण पोटात गेलेली हरीतकी कधीच कुपित (त्रास) होणार नाही. अर्थात हिरड्याने कधीच नुकसान करणार नाही फायदाच होईल.

आवळा – यातही लवण सोडून ५ रस असतात. उत्तम रसायन, रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे फळ. आवळा या विषयावरील लेखावरून त्याचे फायदे सर्वांना कळलेच असतील.

बेहडा – यालाच बिभितक ( रोगांना भयभीत करणारा) असेही म्हणतात. आवळा हिरड्या पेक्षा अल्प गुणयुक्त परंतु केसांकरीता खूप फायदेशीर.

या तीन फळाचे विधीवत, योग्य प्रमाणात मिश्रण म्हणजेच त्रिफळा चूर्ण आहे. हे तिनही वनस्पती फळं भिन्न भिन्न इतक्या उपयुक्त आहेत तर एकत्र मिश्रण किती फायदेशीर असेल याचा विचार करा. त्रिफळा उत्तम कोटीचे रसायन अर्थात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या सातही धातूंना वृद्धींगत व पुष्ट करण्याचे काम त्रिफळा चूर्ण करते. किती मोठा प्रभाव आहे त्रिफळाचा आपल्या शरीरावर ! त्रिफळा शरीरात जमा झालेले दोष व मळ यांना बाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे या साठलेल्या दोषांनी निर्माण झालेल्या व्याधी नष्ट होतात, शरीर निरोगी व स्वस्थ होते.

रात्री त्रिफळा गरम पाण्यासह घेतल्यास पोट व्यवस्थित साफ होते. त्रिफळा जलाने डोळे धुतल्यास नेत्ररोग डोळ्यांची जळजळ या तक्रारी दूर होतात. घाव व्रण जखम कोणत्याही प्रकारची असो त्रिफळा काढ्याने धावन केल्यास लवकर भरून येते. त्रिफळा चूर्ण तूप व मध विषम मात्रेत रात्री घेतल्यास दृष्टी चांगली होते. त्रिफळा काढा लोह पात्रात ( लोखंडी कढईत ) भिजवून सकाळी केस धुण्याकरीता वापरावे किंवा त्रिफळा चूर्ण कढईत भिजवून तो लेप केसांना लावावा. यामुळे पांढरे केस काळे होतात.

डोक्यात ऊवा कोंडा झाल्यास त्रिफळा काढ्याने केस धुवावे. खूप फायदा होतो. जिभेला फोड येणे दंतात किड पडणे अशा तक्रारीवर त्रिफळा काढ्याचा गंडूष ( तोंडात धरून ठेवणे) रात्री पोट साफ करण्याकरीता त्रिफळा घेणे फायदेशीर आहे. दाताचे विकार, हिरड्यातून रक्त येणे, तोंडाला दुर्गंध येणे त्रिफळा चूर्ण मंजनाप्रमाणे वापर करता येतो.

योनीस्त्राव, श्वेतस्त्राव, योनीदुर्गंध, खाज सुटणे या स्त्रीयांच्या तक्रारींवर त्रिफळा काढ्याने धावन खूप लवकर फायदा करतो. त्वचाविकार, कुष्ठ यावर त्रिफळा लेप खाज कमी करतो. लठ्ठपणा कमी करण्याकरीता त्रिफळा काढा मधासह घेणे लाभदायक आहे. प्रमेह मधुमेह स्थौल्य रोग दमा, अर्श, भगंदर यावर त्रिफळाचा औषधीयोग खूप फायदेशीर आहे.

त्रिफळा गुग्गुळ, त्रिफला लौह, त्रिफलारिष्ट, त्रिफला घृत अशा विविध स्वरूपात त्रिफला कल्प आयुर्वेदतज्ज्ञ वेगवेगळ्या अवस्थेत वापरतात. असा हा त्रिफळा केवळ पोट साफ करणारा नाही तर सर्व व्याधींचा त्रिफळा उडविणारे उत्तम रसायन आहे.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER