ट्रेंडिंग थिल्लरपणा आणि त्याचे अनुभव…

ट्रेंडिंग थिल्लरपणा आणि त्याचे अनुभव...

Shailendra Paranjapeथिल्लरपणा हा शब्द सध्या चांगलाच ट्रेंडिंग आहे. ट्रेंडिंग म्हणजे प्रचलित. करोना काळात खरं तर वेगवेगळ्या प्रकारचा थिल्लरपणा सर्वांनीच बघितला आहे. पण त्याला थिल्लरपणा म्हणावं की नाही, हा प्रश्न कधी पडला नव्हता. गेल्या दोन दिवसात मात्र थिल्लरपणा या शब्दानं सारं व्हर्च्युअल अवकाश व्यापल्यावर गेल्या सहा सात महिन्यातले सगळे थिल्लरपणे पटकन् मनःपटलासमोरून चित्रपटातली दृष्य सरकत जावीत, तसे सरकत गेले.

करोना (Corona) काळात सरकारी निर्णयांच्या पातळीवरच्या विसंगती, दोन विभागांमधे झालेल्या सुंदोपसुंदी, त्यामुळे वेठीला धरली गेलेली जनता, सातच्या आत घरात, असं म्हणताना करोना रात्री पसरतो की काय अशी वाटणारी भाती, वृत्तपत्रांमुळं म्हणजे घरोघरी वृत्तपत्र दिल्यानं करोना पसरतो की नाही, एसटी बसमधून २२ माणसं सुरक्षित अंतर ठेवून पुणे-मुंबई, पुणे-कोल्हापूर असे चार पाच तास बसून गेले तर चालते पण एसटीबसपेक्षा मोठ्या आकाराच्या हॉटेलमधे सुरक्षित अंतर पाळून पंधरा वीस मिनिटात अन्न खाल्लं तर करोना पसरतो हा सरकारी शोध, तीच गोष्ट जिम किंवा व्यायामशाळांची..

असे सारे स्टडीड किंवा थिल्लर निर्णय आपण सर्वांनीच बघितले, अनुभवले आणि भोगले आहेत. गंमत बघा, हॉटेल, रेस्ट़ॉरण्ट्स, बार सुरू, पण मंदिरं मात्र बंद…लग्नाला आधी पन्नास आता शंभर लोक येऊ शकतील, हाही अतार्किक निर्णयच म्हणावा लागेल…कारण लग्नाचा हॉल किंवा पुण्यात म्हात्रे पुलालगत असलेल्या मोठमोठ्या लॉन्स विचारात घेतल्या तर पुरेसं सुरक्षित अंतर वा सोशल डिस्टन्स पाळूनही दोन चारशे लोक सहज कोणत्याही समारंभाचा आनंद घेऊ शकतात. एकीकडं अर्थव्यवस्थेला गती द्यायचीय म्हणायचं आणि दुसरीकडे अतार्किक निर्णय घ्यायचे, याला कुणी थिल्लरपणा म्हणून संबोधलं तर थिल्लर या शब्दाचा कीस न काढता पुढचे निर्णय तरी तार्किक व्हावेत, ही अपेक्षा आहे.

पुण्यात गेल्या वर्षी अंबिल ओढ्यालगत भिंत कोसळून हाहाःकार माजला. शेकडो घरांमधे पाणी घुसून लोक विस्थापित झाले. काही तर गेले वर्षभर आपल्या घरात जाऊ शकलेले नाहीत. त्या घटनेला गेल्या पंधरवड्यात एक वर्ष पूर्ण झाल्यावर वृत्तपत्रांनी, टीव्हीवाल्यांनी वर्षभरात काहीही करेक्टिव्ह मेझर्स वा सुधारणा झालेल्या नाहीत, याकडे लक्ष वेधलं.

पालकमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) स्वतः पालिकेला लक्ष्य केलं कारण पालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यावर राजकारण झालं आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अंबिल ओढ्यालगत गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, त्यांना पवार यांनी जाब विचारावा, असा वृत्तपत्रीय भाषेत पलटवार केला. पण आता अंबिल ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधायचे कार्यनिर्देश म्हणजे वर्क ऑर्डर देण्यात आलीय. गमतीचा भाग म्हणजे साडेपाच किलोमीटर लांबीची भिंत बांधणे आवश्यक असताना केवळ तीन साडेतीन किलोमीटरच बांधता येणार आहे कारण उरलेल्या दोन किलोमीटर अंतरात झालेली अनधिकृत बांधकांमं किंवा विविध प्रकारच्या व्यवसायांची अनधिकृत बांधकामं.

सर्वसामान्य पुणेकर सगळ्या प्रकारचे कर प्रामाणिकपणे भरत असताना फुटाफुटावर अतिक्रमणे राजरोसपणे होतात, तीही राजकीय आशीर्वादाने. राजकीय पलटवार होतात पण अनधिकृत बांधकामं किंवा अनधिकृत कामं निरस्त करण्याच्या वेळी सगळे राजकारणी एकत्र येतात आणि अर्थपूर्ण युती करतात. याला थिल्लरपणा म्हणावा का आणि हा थिल्लरपणा समाजानं सहन का करावा…

थिल्लरपणाची व्याख्या शब्दकोशात नक्कीच असणार. त्याला नकारात्मक छटा खचितच आहे. राजकीय वादांमधे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वापलेल्या थिल्लरपणा या शब्दाचे स्पष्टीकरणही दिले आहे. त्यावरच्या उलट सुलट प्रतिक्रियांनी अल्प काळ करमणूक होईलही पण व्यापक पातळीवर पालिका, राज्य सरकार आणि त्यांचा कारभार यातला थिल्लरपणा नाहीसा होईल का, हा खरा प्रश्न आहे. अन्यथा, सोशल मिडियावरून ट्रेंडिंग असलेला थिल्लरपणा गायब होईल पण रोजच्या व्यवहारात मात्र तो विविध रूपांनी अनुभवाला  येतच राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER