कोल्हापुरात वृक्ष गणनेत घोटाळा : स्थायीत आरोप

कोल्हापूर : शहरातील वृक्ष गणनेचा ठेका तेराकॉन कंपनीला ५६ लाख रुपये दिला आहे. मात्र, शहरातील एकाही झाडाला मार्क केलेले नाही. काम चूकीच्या पध्दतीने केलेले आहे. यासर्व कामाची चौकशी करुन रक्कम वसूल करावी, अशी मागणी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केली. वृक्षप्राधिकरण समितीचा मनमानी कारभार सुरू असून समित बरखास्त करण्याची मागणी सदस्यांनी केली.

शहरातील वृक्ष गणनेत मोठा घोटाळा झाला आहे. कार्यालयात बसूनच संस्था काम करीत आहे. शहरातील एकाही झाडावर मोजणी केल्याचे निशान दिसून येत नाही. संस्थेने आतापर्यंत दिलेल्या प्रभागावार झाडांच्या आकडेवारीतही संदिग्धता आहे. यासर्व कामाची चौकशी करुन कंपनीकडून पैसे वसूल करावेत अशी मागणी सदस्यांनी केली. यावर बचावात्मक पावित्रा घेत, एकात्मिक रस्ते प्रकल्पावेळी उच्च न्यायालयाने सेवाभावी संस्थेकडून वृक्ष गणना करुन घेण्याचा दिला होता. गणनेची माहीती महापालिका वेबसाईटवर व गुगलवर अपलोड आहे. याबाबत पुढील स्थायी समितीला अहवाल सादर करु असे प्रशासनाने स्पष्ट केले.

अमृत योजनेमध्ये ड्रेनेज व हरित पट्यासह बागा विकसित केल्या. अनेक भागात पाण्याने भरलेल्या विहीर असूनही कॉन्ट्रॅक्टरची मुदत संपल्याने बागा वाळत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर नेमण्याचे ठरले. महापालिकेची लाईनबाजार येथील शाळा नंबर सहा येथील शाळेच्या परिसरात पार्कींग केले जाते. शाळेच्या मुलांना त्रास होत असल्याने गेट बसविण्याची सुचना झाली. सहा महिन्यापासून बंद असल्याची तक्रार सदस्यांनी केली. टीपीतील कामकाजाची लेखी माहिती सदस्यांनी मागविली. तसेच बायोमेडीकल वेस्टबाबत अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे ठरले. यावेळी विविध विषयावर झालेल्या चर्चेत सभापती संदीप कवाळे, शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, भूपाल शेटे, विजय सुर्यवंशी , माधुरी लाड, नियाज खान, आदीनी सहभाग घेतला.