मेट्रो कारशेड बीकेसीत स्थानांतरित करणे अव्यवहार्य – फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis.jpg

मुंबई :- मेट्रो कारशेड बीकेसी अर्थात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या बुलेट ट्रेनच्या जागेवर स्थानांतरित करण्याची चाचपणी ठाकरे सरकारने सुरू केली आहे. मात्र हा पर्याय अव्यवहार्य आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

ते म्हणालेत, “बुलेट ट्रेन पूर्णतः भूमिगत म्हणजेच अंडरग्राऊंड स्वरुपाचा प्रकल्प आहे. जमिनीच्या तीन लेव्हल तो खाली आहे. जमिनीवरची फक्त ५०० मीटर जागा बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणार आहे. या कारशेडसाठी तितकी जमीन उपलब्ध नसेल आणि त्यामुळे ते भूमिगत करायचे ठरविले, तर ५०० कोटींच्या बांधकामाची किंमत ५ हजार कोटी रूपयांवर जाईल. शिवाय, भूमिगत कारशेडच्या देखभालीचा खर्च हा जमिनीवरील कारशेडच्या देखभालीपेक्षा पाच पट अधिक असतो. त्यामुळे हा पर्याय ववापरल्यास मेट्रो प्रकल्प कायमस्वरूपी अव्यवहार्य ठरेल. असे सल्ले जे कुणी देत आहेत, ते संपूर्ण राज्याला आणि सरकारला बुडविण्याचे सल्ले देत आहेत.

मोकळ्या जागेचा विचार करायचा झाला, तर एकत्रित २५ हेक्टर जागा एका ठिकाणी उपलब्ध नाही. समजा उपलब्ध झालीच तर एमएमआरडीएच्या शेवटच्या व्यवहाराचा दर लक्षात घेता या जागेसाठी २० हजार कोटी रूपये लागतील. (अगदी अलीकडच्या काळातील व्यवहार तपासला तर एमएमआरडीएने सुमिटोमोला दिलेली जागा. १८०० कोटी रूपये प्रति हेक्टर या दराने दिली आहे.), अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का? या पर्यायाची चाचपणी करण्यात येते आहे, असे कळते. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरकात देवेंद्र फडणवीस म्हणालेत, सरकारला ज्या कुणी हा सल्ला दिला आहे तो योग्य नाही. हा राज्याला आणि सरकारला बुडवण्याचा सल्ला आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांची ताकद असती तर आज फडणवीसांचं सरकार असतं – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER