७० कोटी युरोच्या ट्रान्सफर फीने मेस्सीला बार्सिलोनाकडेच रोखले

Lionel Messi

फुटबॉल (Football) जगतातील सर्वांत खळबळजनक घडामोडीत सुपर स्टार लियोनेल मेस्सीने (Lionel Messi) नाट्यमय घूमजाव करत बार्सिलोना (Barcelona) क्लब सोडून जाण्याचा इन्कार केला आणि आपण ठरल्याप्रमाणे किमान २०२१ पर्यंत तरी बार्सिलोनासाठीच खेळणार असल्याचे स्पष्ट केले. गोल डॉट कॉम या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मेस्सीने ही भूमिका स्पष्ट केली आणि बार्सिलोनाच्या व्यवस्थापनावर नाराज मेस्सी दुसऱ्या क्लबकडे जाणार असल्याच्या महिनाभरापासूनच्या चर्चा सध्या तरी थांबवल्या आहेत.

मेस्सीने म्हटले आहे की, आयुष्यभर आपण ज्या क्लबसाठी खेळलो त्या क्लबला आपण कधीही न्यायालयात खेचणार नाही, म्हणून मी बार्सिलोनासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते; पण मला माझ्या कारकिर्दीचा शेवट बार्सिलोनासोबतच करायचा आहे.

बार्सिलोनाने म्हटले होते की, मेस्सीच्या क्लब सोडून जाण्याचे कलम जूनमध्येच संपले आहे आणि त्याचा २०२१ पर्यंतचा करार अजूनही वैध आहे. मेस्सीला क्लब सोडून जायचे असेल तर त्याला ७० कोटी युरोची रक्कम बार्सिलोना क्लबला द्यावी लागेल; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता तर मेस्सीच्या चमूने तो क्लब सोडून जाण्यास मोकळा असल्याचे म्हटले होते. ला लिगानेसुद्धा बार्सिलोना क्लबच्या भूमिकेचे समर्थन केले होते आणि त्याने क्लबची रक्कम चुकती केल्याशिवाय ते त्याच्या ट्रान्सफरचा विचार करणार नसल्याचे म्हटले होते. याला मेस्सीचे वडील जॉर्ज यांनी मात्र विरोध केला होता आणि ही अट लागूच होत नसल्याचे म्हटले होते. जॉर्ज हे लियोनेलचे एजंटसुद्धा आहेत. त्यांनी बुधवारी बार्सिलोना क्लबचे अध्यक्ष जोसेफ मारिय बार्तोमी यांच्याशी समोरासमोर चर्चासुद्धा केली होती. या चर्चेनंतरच मेस्सीने बार्सिलोनाकडेच कायम राहण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे.

मेस्सीने म्हटले आहे की, सध्या तरी आमची कोणतीही वेगळी योजना नाही. आम्ही काही गोष्टी व्यवस्थित करू इच्छितो व काही सुधारू इच्छितो. आपण जोसेफ मारिया यांना पाठवलेला फॉक्स हा त्यांना मी खरोखरच क्लब सोडून जाण्याच्या विचारात आहे हे कळविण्यासाठी होता; कारण ते माझ्या म्हणण्याकडे लक्षच देत नव्हते. अध्यक्षांनी मला सांगितले होते की, बार्सिलोना सोडून जाण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे क्लबला ७० कोटी युरोची ट्रान्सफर रक्कम देणे. हे शक्य नव्हते आणि दुसरा मार्ग न्यायालयात जाण्याचा होता; पण या क्लबवर माझे प्रेम आहे म्हणून मी त्यांना कधीच न्यायालयात खेचणार नाही.

मेस्सीला वाटते की, क्लब सोडून जाण्याच्या त्याच्या विनंतीकडे क्लबने वारंवार दुर्लक्ष केले. याबद्दल तो म्हणतो की, ते म्हणतात की, मी क्लब सोडून जाणार असल्याचे १० जूनच्या आधी सांगायला हवे होते; पण सामन्यांमध्ये व्यस्त होते आणि ते योग्य नव्हते. याशिवाय अध्यक्ष मला नेहमीच म्हणायचे की, यंदाचा मोसम संपला की, तू निर्णय घेऊ शकतोस थांबायचे की जायचे! त्यांनी कोणत्याही तारखेचा उल्लेख केला नाही. म्हणून माझा फॉक्स त्यांना कळविण्यासाठी होता. मला भांडण करायचे नव्हते. क्लबशी भांडायची माझी इच्छाच नाही. आपली नाराजी दिवसेंदिवस वाढतच गेली आणि बार्सिलोना संघ चॅम्पियन्स लिगबाहेर फेकला गेला केवळ हेच कारण नव्हते. बायर्न म्युनिककडून लाजिरवाण्या पराभवाचाही त्याच्याशी संबंध नव्हता. मी नेहमीच म्हणत आलोय की, मला माझ्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत बार्सिलोनासाठीच खेळायचे आहे. मला संघासाठी ट्रॉफीज जिंकायच्या आहेत. पण हल्ली तशी कोणतीही चिन्हे दिसत नव्हती आणि क्लबकडेही तशी काही योजना नाही. ते प्रयोग करत आहेत. मी नेहमीच माझे कुटुंब व क्लबच्या भल्याचा विचार केला आहे.

चर्चा होती की, मँचेस्टर सिटी हे मेस्सीला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक होते.

आतापर्यंत आपल्याला कायदेशीर लढावे लागले तर त्रासदायक होईल म्हणून बार्सिलोनाचे नवे प्रशिक्षक रोनाल्ड कोएमन यांच्यासोबत मेस्सी सराव शिबिरात सहभागी होण्यास टाळत होता; पण आता तो शिबिरात सामील होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER