
नवी दिल्ली: सज्ञान मुला-मुलींनी पालकांच्या इच्छेविरुद्ध आंतर-जातीय किंवा आंतरधर्मिय प्रेमविवाह करण्याची संवेदनशील प्रकरणे कटुता व तणाव निर्माण न होता कशी हाताळावीत याचे पोलीस अधिकार्यांना प्रशिक्षण दिले जावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत.
यासाठीची मार्गदर्शिका (Guidelines) आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा येत्या दोन महिन्यांत तयार केली जावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. अशा प्रकरणांमध्ये खरे तर कोणताही फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यास वाव नसल्याने अशा प्रेमविवाहांमुळे कुटुंबांमध्ये आणि एकूणच समाजात निष्कारण निर्माण होणारी कटुता टाळण्यासाठी तपासी अधिकाºयांना प्रशिक्षण देऊन संवेदनशील करणे हाच मार्ग आहे, असे न्यायालयाने म्हटले.
न्या. संजय कृष्ण कौल व न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना म्हटले की, पूर्वी विवाहांच्या बाबतीत जात आणि समाजाची भूमिका महत्वाची असायची. परंतु आता सुशिक्षित तरुण मुले आणि मुले आपले जीवनसाथी स्वत: निवडू लागले आहेत. जात आणि समाजांमधील तणाव कमी करण्याचा असे आंतर-जातीय विवाह हाच उत्तम मार्ग असला तरी दरम्यानच्या काळात अशा तरुण दाम्पत्यांना धमक्या व धाकदपटशांना सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. अशा त्रासलेल्या दम्पतींना न्यायालये वेळोवेळी मदतही करत असतात.
न्यायालयाने पुढे म्हटले की, दोन सज्ञान व्यक्तींनी राजीखुशीने विवाह करायचे ठरविल्यानंतर त्या विवाहास त्यांच्या कुटुंबाची किंवा समाजाची संमती असण्याची कोणतीही गरज नसते, हे कायद्याचे तत्व असंख्य न्यायनिर्णयांनी आता सुप्रस्थापित झाले आहे. मनपसंत पर्याय निवडणे हा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचाच अविभाज्य भाग असतोय या पर्याय निवडण्याच्या स्वातंत्र्याला सामुहिक मानसिकता किंवा सामाजिक मान्यतेची बंधने घातली जाऊ शकत नाहीत.
बेळगाव जिल्ह्याच्या सावदत्ती तालुक्यातील मुरगुड येथील लक्ष्मीबाई चंदरगी व तिचा पती संतोष सिंग यादव या प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याने संरक्षणासाठी केलेली याचिका निकाली काढताना हा निकाल दिला गेला. यातील लक्ष्मीबाई एम.ए., बी. एड. आहे तर संतोष सिंग एम. टेक आहे. दोघेही बेलघाव येथील निरनिराळ््या कॉलेजांमध्ये अध्यापक आहेत.
आंबेडकरांच्या विचारांना स्वीकृती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट्स’ या पुस्तकातील हा उतारा संमतीसह उद्धृत करून खंडपीठाने निकालपत्राचा समारोप केला:‘ आंतरजातीय विवाह हाच जातीप्रथा नष्ट करण्याचा उपाय आहे, याविषयी मला खात्री वाटते. अशै विवाहांनी रक्ताची सरभेसळ झाल्यानेच विविध जातींमध्ये बंधुभाव व एकोप्याची बावना वाढीस लागेल. ही भावना परमोच्च झाल्याशिवाय जातीप्रथेमुळे निर्माण झालेला दुजाबाव संपुष्टात येणार नाही. जेव्हा अन्य नातीसंबंधांनी समजाची वीण घट्ट असते तेव्हा विवाह ही जीवनातील एक सामान्य घटना असते. परंतु जातीपातींनी विभागलेल्या समाजास एकत्र बांधून ठेवण्यासाठी विवाह ही एक नितांत गरज ठरते. आंतर-जातीय विवाहांखेरीज अन्य कशानेही जातीप्रथेचे निर्मूलन होऊ शकणार नाही.
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला