‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’चा ट्रेलर रिलीज

शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला”, या शब्दांत तानाजीच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते.

Tanhaji

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर, सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअली खान दिसणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या सिनेमात वर्णन केली आहे.

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणचे मित्र होते, तसेच ते मराठा साम्राज्याचे वीर सुभेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत त्यांचा सहभाग होता. ते कोंढाण्याच्या लढाईसाठी ओळखले जातात. कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. तेव्हा आपल्या मुलाचं लग्न अर्धवट सोडून त्यांनी “आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे” म्हणत कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला. किल्ल्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली.

शिवाजी महाराजांनी “गड आला पण सिंह गेला” या शब्दांत तानाजीच्या मृत्यूचे दु:ख व्यक्त केले होते. या सिनेमात अजय देवगण तानाजींची मुख्य भूमिका निभावत आहे. अजय देवगणचा हा शंभरावा सिनेमा आहे. तर काजोलने सावित्री मालुसरेंची भूमिका केली आहे. काजोल आणि अजय देवगण यांची जोडी नेहमी हिट ठरली आहे. ते मग सिनेमांमध्ये असो किंवा खऱ्या आयुष्यात. या दोघांनी आजवर ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’ यासारख्या अनेक सिनेमांत काम केले आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने १२ वर्षांनंतर अजय देवगण आणि सैफअली खान पुन्हा एकदा एका सिनेमात दिसणार आहेत. याआधी त्यांनी ‘ओमकारा’ या सिनेमात सोबत काम केले होते.