कर्नाटकात दुर्दैवी घटना : ऑक्सिजनअभावी सरकारी रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू

24 patients die in government hospital - Maharashtra Today

बेंगळुरू :- कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजन मिळाला नसल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यास उशीर लागल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हैसूरच्या चामराजनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. चामराजनगर रुग्णालयाला बेल्लारीहून ऑक्सिजन उपलब्ध होणार होता. परंतु ऑक्सिजन येण्यास उशीर झाला. त्यामुळे ही मोठी घटना घडल्याचं  सांगितलं जात आहे.

ऑक्सिजनअभावी मृत्यू पावलेल्यांमधील सर्वाधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजन संपल्यानंतर ते तडपू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्री ही घटना घडली. या रुग्णालयात एकूण १४४ रुग्ण उपचार घेत होते. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन एकच आक्रोश केला असून या परिसरात वातावरण तंग झालं आहे. चामराजनगरमधील घटना अत्यंत दुर्दैवी  आहे. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

म्हैसूर, मंड्या आणि चामराजनगर येथे जात आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि काय समस्या आहे याची माहिती घेऊन समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असं कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितलं. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button