रूढी परंपरा आणि आपण

Traditions

श्रावण-भाद्रपद म्हटलं की सणावारांचे दिवस सुरु होतात आणि गौरी गणपती नवरात्र एकापाठोपाठ सणांची गर्दी होते.
असंच एकदा गणपतीची प्रतिष्ठापना सुरू असताना छोटा अथर्व पूजा करत होता. आणि आजी त्याला सांगत होती की तिथे विडा ठेव. तिकडे एक विड्याचं पान ठेव. त्यावर सुपारी ठेव वगैरे. पण अथर्वला कायमच असं का ? असा प्रश्न पडत असतो आणि तो ते आजीला विचारतो. तेव्हा आईला नेहमी त्याला रागवावे लागते, की “आजी सांगते आहे ना, आजीला माहित आहे काय ते . तू काय ते व्यवस्थित कर !”मोठ्यांचा ऐकायचं या संस्कारांना नुसार तो करतोही ते. पण प्रश्न विचारू नये हे आपले संस्कार तसे म्हणाल तर अयोग्यच.परंतु बरेचदा या कर्मकांडांची उत्तरे कोणालाच माहीत नसतात. त्यामुळे त्याला प्रश्न विचारायचं नाही आणि ज्येष्ठांना उगीच संकटात पडायचे नाही असे कारण त्यामागे असावे.

निरनिराळ्या धर्मात, जातीत, समाजांमध्ये निरनिराळ्या रूढी-परंपरा, कर्मकांड असतात. प्रत्येक कृतीमागे पूर्वी अर्थ असणारच. पण तो संदर्भ संपला की कृती बंद व्हायला पाहिजे. मात्र तसं होत नाही, ती चालूच राहते. एकूणच कुठल्याही बदलाबाबत मनुष्य घाबरत असतो. त्याला त्याचा कम्फर्ट झोन सोडून विचार करायलाही आवडत नाही. आणि त्यामुळे बदल करत असताना कायम कुठे न कुठे तो आधार शोधत राहतो. आणि उगीचच कुठल्यातरी रुढींचा, संकेतांचा उगम होतो.

तसा विचार केला तर आजच्या रुटीन मध्ये कुठल्या रूढी आणि परंपरा पाळणे शक्य आहे ?

रुढींचे पालन काही गोष्टींमुळे आपण करत असतो. त्यापैकी १) पहिली म्हणजे काही गोष्टी कोणाच्यातरी आग्रहामुळे पाळल्या जातात तर२) काही केवळ सवयीने परंपरेने पाळल्या जातात आणि ३) काही अजिबात पाळल्या जात नाहीत.
आपले जेष्ठ, श्रेष्ठ सामाजिक नेते त्याला शास्त्राचा आधार आहे. शास्त्र असे सांगते ! वगैरे सांगत असतात. पण” दाखवा शास्त्रात कुठे सांगितले ते?” अशी उलट उत्तर द्यायची नसल्याने असा प्रश्न आज पर्यंत कोणी केला नाही, करतही नाही.

ही बातमी पण वाचा : सप्तपदी मी रोज चालते !

माझा स्वतःचा रूढी, चालीरीती, परंपरा, याला पूर्ण विरोध नाही. कर्मकांड मात्र फार उपयोगाचे असते असं मला वाटत नाही. आणि त्यासाठी त्यामागची कारणे शोधण्याचा माझ्यापुरता प्रयत्न मी करते. अर्थात नवीन पिढीने सुद्धा पूर्णपणे रूढी, परंपरा, चालीरीती झुगारून देण्याऐवजी त्यामध्ये काही गोष्टी आहेत का हे तपासून पाहिल्याखेरीज उगीचच फक्त विरोधासाठी विरोध करू नये असे वाटते. आणखीन एक म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिचे तिचे स्वतंत्र असे मत आहे,ते व्यवहारात आणण्यासाठी ती स्वतंत्र आहे. त्यामुळे आपली मतं तपासून बघताना आपल्या पुरती मर्यादित ठेवावी. ती दुसऱ्यावर लादू नये असंही मला वाटतं.कारण आज कदाचित मला त्यामागचं कारण कळत नसेल. उद्या चालून मला ते समजेलही.

पूर्वी लोक निरक्षर ,अशिक्षित आणि पापभिरू होते. आयुष्याला एक शिस्त व्यवस्थितपणा हवा असे. संस्कार म्हणजे (योग्य वागणूक ,नम्रता असणे, मग्रुरी नसणे) श्रद्धा आली. त्यांना त्यामागचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजला नसता, नव्हे तो विकसित ही झाला नव्हता.

उदाहरणार्थ मेलोटोनिनची माहिती आज उपलब्ध आहे. पण तेव्हा ती नव्हती .त्यामुळे पहाटे उठावे, “लवकर निजे लवकर उठे” वगैरेसारखे संस्कार आणि रूढी सांगितल्या जात असाव्या. मासिक पाळीचे शास्त्रीय कारण कळत नव्हते, आराम गरजेचा असल्याने त्यांना ते पटावे म्हणून कदाचित सक्तीची विश्रांती “अशा पद्धतीने “सांगितले गेलेली असावी.

अशा अनेक रूढी, परंपरा शास्त्रात अशा गोष्टी आहेत की ज्याचा अर्थ अजूनही कळत नाही, किंवा मला कळलेला नाही. शंखात पूजा करताना पाणी भरून ठेवावे, देवघरात सगळे देव डाव्या बाजूला आणि देवी उजव्या बाजूला ठेवावे. (तिथेही कंपार्टमेंट) सवाष्णीची फक्त ओटी भरावी. वगैरे.

ही बातमी पण वाचा : जुळून येती रेशीमगाठी

मध्यंतरी याबाबत अतिशय कटू प्रसंग माझ्या कानावर आला. एकीकडे संक्रांतीचे हळदीकुंकू होते. तिने तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलावले. त्याचबरोबर तिच्या अगदी जवळची मैत्रिणी तिलाही बोलावले. दुर्दैवाने सहा-आठ महिन्यात पूर्वी त्या मैत्रिणीचे मिस्टर तिला एकटीला सोडून निधन पावलेले होते. म्हणजे मुळातच ती खुप दुःखी होती. अशा परिस्थितीमध्ये या मैत्रिणीने तिला हळदी कुंकवाला बोलावले. जवळची मैत्रीण बोलावते आहे म्हणून ही गेलीदेखील. यजमान मैत्रीण आत असताना तिच्या नवीन सुनेनें हिला हळदी-कुंकू आणि वाण दिले. तशी अचानक मैत्रीण आतून बाहेर धावत आली आणि घाईघाईने तिने या मैत्रिणीच्या हातातले वाण अक्षरशः हिसकावून घेतले. आणि तिच्या हातात दुसरे वाण दिले. ते वाण सवाष्णीला देण्याचे नव्हते. मैत्रीण प्रचंड दुखावली गेली. त्या मैत्रिणी तिची ओटी ही भरून दिली नाही. खरंतर तिची ओटी ऑलरेडी भरली गेलीय. तिच्या पदरी दोन मुले आहेत.

या प्रसंगाने ती मैत्रीण दुखावली गेली. कोलमडून पडली.दोन रात्र दुःखाने तळमळत होती. ही कुठली आलीय रूढी? परंपरा ? आत्ताही या काळात? रूढी पाळतांना कुठला सुशिक्षितपणा म्हणावा हा?

याला माणुसकी नसणे म्हणतात. काय रूढी परंपरा म्हणजे माणुसकीचा अव्हेर असावा का? खरंच किती कोती विचारसरणी आहे ही ! एवढीच परंपरेचा पाईक होण्याची इच्छा असेल तर बोलवायच कशाला समोरच्या व्यक्तीला ?

या प्रसंगाने मी खरंच सुन्न झाले.अनेकानेक वर्षांच्या संस्कृतीच्या प्रवासात आणि विवाह पद्धतीचा इतिहासातले वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्यात लोकांच्या सोयीनुसार गरजेनुसार थोडेथोडे बदल होत गेले. पूर्वी पाच दिवस चालणारे विवाह सोहळे कार्यालयाची उपलब्धता आणि मिळणाऱ्या सुट्ट्या नुसार एका दिवसात आटपले जाऊ लागले. पण परत आलेली सुबत्तेची सूज “हौसेला मोल नाही” या लेपाखाली दाबली जाऊन परत हळद, संगीत, पेशवाई पंगत, प्री-वेडिंग फोटोग्राफी यांच्यामध्ये रूपांतरित झाली.

या सगळ्यामागे विवाह, त्यामागच्या पद्धती, रिती या सगळ्यांना असणारा अर्थ समजावून घेऊन करण्याकडे कल नाही. मुलाकडची व मुलीकडची वगैरे बाजू काही नाही. सगळे एकाच वेळी जेवायला बसतील असे कितीही ठरवले तरी वधुपिता हा हात जोडून आग्रह करत पद्धतीतून फिरताना दिसतात .या पार्श्वभूमीवर विवाह संस्कारातून खऱ्या अर्थाने घेतलेल्या हजारो शपथा मात्र दुर्लक्षित राहतात. याचा गांभीर्याने विचार केल्या जात नाही.

विवाहसंबंधीचा पूर्वीपासून चालत आलेला भाग म्हणजे पत्रिकेचा. कित्येक विवाह पत्रिका बघून अयोग्य, असमाधानी होताना दिसतात. तर कित्येक न बघता ही सुंदर सहजीवन चाललेले असते.

आजच्या मानसशास्त्रातील प्रगतीनुसार व्यक्तिमत्व चाचण्या, विवाहपूर्व समुपदेशन गरजेचे ठरते. स्वभाव जुळणे, समायोजन क्षमता महत्त्वाची ठरते. कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व जुळू शकतात याचा अभ्यास आज मानसशास्त्रात झालेला दिसतो. याशिवाय लाइफ स्किल्स , संवाद कौशल्य, व इतर सुद्धा विवाह यशस्वी होण्याला उपयोगी पडतात. म्हणूनच रूढी, परंपराबाबत डोळस दृष्टिकोन हवा हे मात्र खरे !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER