नागरीकत्व कायदयाच्या समर्थनामुळे उद्याच्या किनवट बंदला व्यापार्‍यांचा विरोध !

CAA - Kinwat

किनवट :- तालुका प्रतिनिधी-सीएए विधेयकाच्या विरोधात बुधवारी दि.२९ रोजी पुकारलेल्या बंदला स्थानिक व्यापार्‍यांनी तीव्र विरोध करीत विधेयकाला जोरदार समर्थन दिले आहे. व्यापार्‍यांनी कोणतीच प्रतिष्ठाने बंद ठेवू नयेत, असे आवाहनही व्यापारी संघटनेने केले आहे.

यासंदर्भात येथील उपविभागीय दंडाधिकारी अभिनव गोयल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने दि.१० जानेवारीपासून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. यास आमचे पूर्ण समर्थन आहे. यापूर्वी याच कायद्याच्या निषेधार्थ कांही राजकीय पक्ष तसेच विशिष्ट संघटनांनी बंद पुकारला होता.परंतु कायदा व सुव्यवस्थेचा तसेच संभाव्य नुकसानीचा विचार करून आम्ही नाईलाजाने आमची प्रतिष्ठाने बंद ठेवली. बुधवारी एका विशिष्ट संघटनेने किनवट बंदची हाक दिली आहे. या बंदला आमचे समर्थन अथवा सहकार्य असणार नाही. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने नेहमीप्रमाणे सुरुच राहतील.

ही बातमी पण वाचा : पूर्णा: एनआरसी, सीएए कायदा विरोधात महिलांचे जनआंदोलन सुरू

बंददरम्यान आमच्या प्रतिष्ठानांची नासधूस अथवा नुकसान झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व बंद पुकारणार्‍या संघटनेवर राहील. सीएए हा कायदा भारतीयांच्या हिताचा असल्याने आम्ही याला पूर्णतः समर्थन देत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. निवेदनाच्या प्रती पोलीस प्रशासनासह सर्व संबंधितांना दिल्या असून, त्यावर किराणा, भुसार, कापड, ज्वेलर्स, मेडिकल, सिड- फर्टीलायझर्स, हार्डवेअर, खानावळ व्यापार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.