‘तौक्ते’ वादळात बुडालेल्या ‘पी-३०५’ वरून आरोप-प्रत्यारोप; आशिष शेलारांनी दिले ठाकरे सरकारला कारवाईचे आव्हान

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळात (Touktae cyclone) पी – ३०५ (P – 305) समुद्रात बुडून झालेल्या अपघातात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या प्रकरणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे तर भाजपाचे नेते, आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या प्रकरणी काही प्रश्न विचारून राज्य सरकारला कंपनीवर कारवाई करण्याचे आव्हान दिले आहे.

शेलारांचे प्रश्न

१) समुद्रात कोणत्याही प्रकारचे काम करणाऱ्या जहाजांना ‘ओएनजीसी’च्या नियमानुसार दरवर्षी १५ मे रोजी पाण्याबाहेर यावे लागते. त्यासाठी सदर काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला १२ मे रोजी कर्मचाऱ्यांना परतीच्या प्रवासाला घेऊन निघणे आवश्यक असते. मग अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडनं १५ जूनपर्यंत मुदतवाढीची मागणी का केली होती?

२) ११ मे रोजी संपूर्ण किनारपट्टीवरील यंत्रणांना तौक्ते चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. असं असताना सदर अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेनं तराफ्यावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी का आणले नाही?

३) ‘ओएनजीसी’च्या इतर कंत्राटदार कंपन्यांनी वादळाची पूर्वकल्पना मिळताच आपल्या कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाहेर आणले होते, मग याच एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना वेळीच सुरक्षितपणे पाण्याबाहेर का काढले नाही?

४) या क्षेत्रात बंधनकारक असलेल्या नेव्हल सिक्युरिटी सर्टिफिकेट (एनएससी) डिफेन्स, ओएनजीसीने मुदतवाढ अ‍ॅफकॉनला दिलेली नाही. तरीही काम का सुरू ठेवलं?

५) तराफ्याला इंजिन नसल्याने त्याला वाहून नेणारे जहाज आणि तांत्रिक मदत करणारे कंत्राटदार कंपनीची यंत्रणा दुर्घटना घडली तेव्हा तैनात नव्हती, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. हे खरे आहे का?

६) एकट्या कॅप्टनला जबाबदार धरून सदरची कंत्राटदार कंपनी या दुर्घटनाप्रकरणातून अलिप्त कशी काय राहू शकते? किंबहुना ही सर्वस्वी जबाबदारी सदर कंत्राटदार कंपनीचीच आहे.

७) ज्या कंत्राटदार कंपनीला हे काम मिळाले ती कंपनी तांत्रिक दृष्टीने सक्षम नसल्याचा वाद अद्याप न्यायप्रविष्ट आहे, याचा या घटनेच्या तपासात काही संबंध उपयोगी ठरू शकतो का?

८) नियमितपणे मान्सूनपूर्व कामे थांबवून वेळीच पाण्याबाहेर येणे आवश्यक असताना सदर कंपनीने काम का सुरू ठेवले? त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी सदर कंपनीवर फौजदारी कारवाई करून, सदर घटनेतील हलगर्जीपणा, बेकायदेशीर काम, बेजबाबदारपणा जनतेसमोर येणे आवश्यक आहे.

या घटनेची चौकशी व्हावी. मृतांच्या नातेवाइकांना योग्य नुकसान भरपाई मिळावी. कंपनीची चूक सिद्ध झाल्यास कंपनीचे कंत्राट रद्द करून कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button