नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार : आरोपीवर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांचा प्रश्न

Uddhav Thackeray - Chitra Wagh

मुंबई :- औरंगाबाद येथील महिलेला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार करण्याच्या घटनेबाबत आम्ही म्हणतो आणि सरकारकडे मागणी करतोय तीच मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. सरकार आरोपीवर कारवाई करणार का? असा प्रश्न भाजपाच्या (BJP) उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सरकारला विचारला आहे.

वाघ म्हणाल्यात, पीडितेला नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केला आणि आता “तो मी नव्हेच” म्हणत पीडित आणि तिच्या परिवारावर दबाव आणला जातो आहे. एवढेच नाही तर पोलिसांकडून या प्रकरणात ‘बी समरी रिपोर्ट’ दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी ही शक्यताही नीलम गोऱ्हेंनी वर्तवली आहे. आता तरी शासन नियमानुसार कारवाई करणार की अजूनही आरोपीला पाठीशी घालणार?

चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. राज्यात ६० वर्षांच्या आजीपासून तीन वर्षांच्या छकुलीपर्यंत अत्याचाराचे सत्र सुरू आहे. सरकारच्या महिला सुरक्षेच्या मोठ्या बाता पोकळ वासाच निघाल्या, असे त्या म्हणाल्या. राज्यातील विविध महिला अत्याचाराच्या घटनांचा संदर्भ घेत सरकारवर सडकून टीका केली. (BJP leader Chitra Wagh criticize Thackeray Government over Women atrocities in maharashtra).

ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या, “लातूर-अहमदपूर येथे ६० वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली. तिने नदीत आत्महत्या करत स्वत:ला संपवले. राज्यात बलात्काऱ्यांना ‘शक्ती’ देण्याचे काम सरकार करते. त्यामुळे या विकृतांचे मनोबल वाढलेले दिसते. तक्रार आल्यावर लगेच मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत, तपास आणि चौकशीच्या नावाखाली अभय देऊ नये.”

विकृतांना पाठीशी घालणे सुरू आहे

दुसऱ्या ट्विटमध्ये रायगडमधील पेणच्या घटनेबाबत त्या म्हणाल्या, “रायगडमधील पेणमध्ये तीन  वर्षीय छकुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. आरोपी जामिनावर बाहेर आलेला होता. याआधीही ‘पॉक्सो’च्या केसमध्ये आरोपी जेलमध्ये होता. विकृती फोफावते आहे.  तिला जेरबंद करायला शासन कमी पडते आहे हे नक्की. कायदे आणता, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना मात्र विकृतांना पाठीशी घालायची शासनाची भूमिका आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या, “पुणे-जुन्नर येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घृणास्पद घटना घडली. आरोपी अद्याप फरार आहेत. आजचे  माझे हे तिसरे  ट्विट जे टाईप करतानाही मला अतीव वेदना होताहेत. ६० वर्षांच्या  आजीपासून तर तीन वर्षांच्या छकुलीपर्यंत अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. सरकारच्या महिला सुरक्षेच्या मोठ्या बाता पोकळ वासाच निघाल्या.”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER