बॉक्स ऑफिसवर कमाई करणारे अक्षयकुमारचे टॉप-१० चित्रपट

Akshay Kumar

साऊथमधील प्रचंड यशस्वी ‘मुनी 2 कंचना’चा हिंदी रिमेक असलेला चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिवाळीत फोडला जाणार आहे. अक्षयकुमारने (Akshay Kumar) या चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका साकारली असून अशा प्रकारची भूमिका त्याने प्रथमच केली आहे. या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन साऊथच्या ‘कंचना’चे (Kanchna) दिग्दर्शन केलेल्या लॉरेंस राघवनेच (Lawerence Raghav) केले आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxami Bomb) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार हे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. परंतु त्याची तारीख सांगण्यात आली नव्हती. मात्र अक्षयने चित्रपटाच्या टीझरसोबत याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करताना अक्षय खूपच आनंदी दिसत होता. या चित्रपटासाठी डिझ्नी हॉटस्टॉरने कोट्यवधी रुपये मोजल्याची चर्चा आहे. सध्या अक्षयकुमारचे स्टार्स खूपच चांगले असून तो ज्याला हात लावेल त्याचे सोने होत आहे.

Akshay Kumar: The rebel without a pause

ओटीटीवर लक्ष्मी बॉम्ब फोडल्यानंतर ‘सूर्यवंशी’ बनून तो मोठ्या पडद्यावर खलनायकांचे निर्दालन करताना दिसणार आहे. अक्षयचे आतापर्यंत बहुतेक चित्रपट यशस्वी झाले असून बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणाऱ्या पहिल्या १० चित्रपटांवर आपण नजर टाकूया- गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये अक्षयकुमारच्या चार चित्रपटांनी प्रत्येकी १५० कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला गोळा केला. या ‘गुड न्यूज’ पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०५.१४ कोटी
रुपयांचा गल्ला जमवून पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. हा विक्रम ‘सूर्यवंशी’ने मोडला असता पण लॉकडाऊन झाला आणि सूर्यवंशीचे प्रदर्शन पुढे ढकलेले गेले. ‘गुड न्यूज’ (Good news) हा एक विनोदी चित्रपट होता ज्यात स्पर्मच्या अदलाबदलीची कथा रंजकपणे मांडण्यात आली होती. गेल्या वर्षीच अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ही (Mission Mangal) प्रदर्शित झाला होता. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या चित्रपटात तापसी
पन्नू, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन अशा प्रथितयश नायिकांनी अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाई करणारा अक्षयचा हा पहिलाच चित्रपट. या चित्रपटाने २०२.९८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. खरे तर हा चित्रपट २०० कोटी क्लबमध्ये जाईल असे कोणालाही वाटले नव्हते; परंतु चित्रपटाने तो विक्रम केला खरा. गेल्या वर्षीच साजिद नाडियाडवाला निर्मित अक्षयकुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख अभिनीत ‘हाऊसफुल-४’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९४.६० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. गेल्या वर्षीच देशभक्तीने ओतप्रोत भरलेला ‘केसरी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील कथा सांगणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५४.४१ कोटींचा व्यवसाय केला होता. २०१८ मध्ये रजनीकांतचा महत्त्वाकांक्षी २.० चित्रपट प्रदर्शित झाला होता.

हा रजनीकांतचा चित्रपट असला तरी त्यात अक्षयकुमारने खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८९.५५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक घरात शौचालय योजनेचा प्रचार करणारा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ प्रदर्शित झाला होता. अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर अभिनीत हा प्रचारकी थाटाचा चित्रपट असला तरी मनोरंजनाने भरलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३४.२२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यापूर्वी २०१२ मध्ये साऊथच्या विक्रमाकुर्दुचा हिंदी रिमेक ‘रावडी राठोड’ नावाने प्रदर्शित झाला होता. अक्षयकुमारने यात दुहेरी भूमिका साकारली होती.

अॅक्शन आणि कॉमेडीने भरलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३३.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. कुवैतमध्ये आलेल्या संकटानंतर तेथील भारतीयांना पुन्हा भारतात आणण्यासाठी कुवैतमधील एका धनाढ्य भारतीयाने केलेल्या कामावर आधारित ‘एअरलिफ्ट’ नावाचा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. अक्षयकुमारने धनाढ्य भारतीयाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १२८.१० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

२०१६ मध्येच आणखी एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता- ‘रुस्तम’. एका नौदल अधिकाऱ्याच्या जीवनावरील या चित्रपटात अक्षयकुमारने रुस्तम या नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर १२७.४९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या यादीत शेवटचा चित्रपट आहे ‘जॉली एलएलबी-२’. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. मूळ ‘जॉली एलएलबी’मध्ये अरशद वारसीने वकिलाची भूमिका साकारली होती. मात्र त्याच्या दुसऱ्या भागात अक्षयकुमारने वकिलाची भूमिका साकारली. या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करीत बॉक्स ऑफिसवर ११७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER