उद्या मोदींचा निकाल

Badgeलोकसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी आहे. मोदी नाही तर कोण? गेली दोन महिने देशाला सतावणाऱ्या ह्या प्रश्नाचे उत्तर उद्या मध्यरात्रीपर्यंत मिळालेले असेल. ५४२ जागांसाठी उभ्या आठ हजारावर उमेद्वारांचीच नव्हे तर त्यांच्या नेत्यांचीही अग्निपरीक्षा आहे. जीवनमरणाचा प्रश्न आहे. सत्तेची सवय झालेले काँग्रेसवाले पाच वर्षे बाहेर असल्याने उपासमारीने हैराण आहेत. एक्झिट पोल्सच्या निकालामुळे घायाळ झालेले विरोधी नेते ईव्हीएमविषयी शंका उपस्थित करीत आहेत. काहींनी तर रक्ताचे पाट वाहतील अशी भाषा चालवली आहे. ‘आम्ही जिंकलो तर ईव्हीएम चांगल्या, हरलो तर वाईट’ ही कुठली मानसिकता आहे? निकाल भाजपच्या बाजूने लागले तर हिंसाचार पेटू शकतो अशी दुर्दैवाने स्फोटक परिस्थिती आहे.

ह्या निवडणुकीत सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे अनेक मुद्दे असले तरी सुरुवातीपासून संपूर्ण निवडणूक ‘मोदी हवेत की नको?’ ह्या मुद्यावरच केंद्रित झाली. विरोधी पक्षांमध्ये एकजूट नसली तरी ‘मोदी नकोत’ ह्या मुद्यावर ते ठाम आहेत. खरेच तसा अंडर करंट असेल तर भाजप आणि त्यांची एनडीए २०० जागांच्या आत गुंडाळली जाईल. मग युपीए किंवा तिसऱ्या आघाडीच्या कुणाचे सरकार येईल. मोदींना ३०० जागांचा विश्वास आहे. पण तो ईव्हीएममध्ये दिसला पाहिजे. तसे झाले नाही तर त्रिशंकू लोकसभा येईल आणि सारा देश अस्थिरतेच्या गर्तेत लोटला जाईल. आघाड्यांचे राजकारण येईल. त्यामुळे उद्या काय होते याकडे देशाचे लक्ष आहे.

विरोधकांनी तर पूर्ण निकाल येण्याआधीच राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेसाठी दावा ठोकण्याची रणनीती चालवली आहे. भाजपने दावा करण्याआधी आपला दावा असला पाहिजे ही त्यामागची मानसिकता आहे. पण पद्धत तशी नाही. सरकार कोण बनवू शकतो ते पाहून त्या पक्षाला बोलावण्याचा राष्ट्रपतीला अधिकार आहे. सर्वात मोठ्या पक्षाला ते बोलावतात. त्यामुळे उद्या कुणाची लॉटरी लागते ते पाहायचे.

ही बातमी पण वाचा : कोण होणार खासदार

मोदींची भट्टी जमली तर सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होणारे गैर-काँग्रेसी सरकारचे ते पहिले पंतप्रधान असतील. सर्वात महत्वाचा मुद्दा बहुमताचा आहे. कुण्या पक्षाला बहुमत नसेल तर सरकार चालवणे अवघड होईल. रुसवेफुगवे, मानापमान, कुरघोड्या चालतील आणि देश मागे पडेल. मोदींची जागा घेण्यासाठी अनेक नेते टपून आहेत. राहुल गांधींनी तर त्यासाठी मोठी आघाडी उघडली होती. मोदींच्या अंगावर धावणाऱ्या ममतादीदींना बंगालमध्ये ३०ही जागा मिळाल्या तर त्यांना पंतप्रधान व्हावेसे वाटेल. सप-बसप आघाडीने उत्तर प्रदेशात भाजपला रोखले तर मायावती पंतप्रधान झालेल्या दिसतील. देवेगौडा, के. चंद्रशेखर राव…कुणाचीही लॉटरी लागू शकते. मनमोहन सिंग, नरसिंहराव पंतप्रधान होतील असा कुणी विचार केला होता? पण झाले. तसली स्थिती येऊ शकते.