उद्याचा मोर्चा मूक नव्हे तर बोलका राहणार; विनायक मेटेंचा इशारा

Vinayak Mete

बीड :- मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी उद्या मोर्चा काढण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र कोरोनाचे (Corona Virus) नियम पुढे करत काँग्रेसकडून मोर्च्याला विरोध होत आहे. यावर मेटे यांनी आपण उद्याचा मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे सांगितले. तसेच उद्याचा मोर्चा हा १०० टक्के निघणार असून, हा मूक मोर्चा नव्हे तर बोलका राहणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी मोर्च्याला परवानगी नाकारली आहे. मोर्च्यास प्रशासनाची परवानगी नाही. मात्र आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर गंभीर आरोप केले. १९८२ साली मराठा आरक्षणासाठी दिवंगत अण्णासाहेब पाटलांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. पण काँग्रेसने त्यांच्या मागण्यांची साधी दखलही घेतली नाही. अण्णासाहेब पाटलांची हत्या करण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासंदर्भात बळी घेण्याचं पहिलं काम काँग्रेसनं केलं आहे. हा माझा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काँग्रेसच्या हत्याच आहेत, असा गंभीर आरोपही मेटेंनी केला.

उद्याचा मोर्चा सरकारच्या चुका दाखवणारा असेल. उद्या आम्ही आमची भूमिका जाहीर करू. उद्या मोर्च्याला येताना कोणी अडवलं तर त्यांना आम्ही परत मोर्च्यात आणण्याचं काम करणार. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी व्हा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

उद्या सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघेल. या मोर्च्याला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नरेंद्र पाटील (Narendra Patil) या मोर्च्यासाठी कालपासून तयारी करत आहेत. मोर्च्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे. बीड जिल्ह्याचा संबंध नसताना काही उपटसुंभ लोक इथे येऊन बोलत आहेत. काही लोकांना हाताशी धरून काँग्रेसचा हा विरोध सुरू आहे. महाराष्ट्राचं नावं काढलं की काँग्रेसच्या पोटात दुखतं. मराठा समाजाचं नाव घेतलं की काँग्रेसचे वांधे व्हायला लागतात. काँग्रेसचे नेते जे कोणी आरोप करत आहेत, त्यांनी जरा पाठीमागे पाहावं. काँग्रेसचं आता फक्त विसर्जन करणं बाकी आहे, असं सांगतानाच काँग्रेस अशोक चव्हाणांच्या नादी लागून महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करणार आहे. पण माझं अशोक चव्हाणांना खुलं आव्हान आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर समोर येऊन बोलावं, असं आव्हानही त्यांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button