उद्याचे महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता

Mumbai Vidhansabha

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरु होत आहे. विधिमंडळाचे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रपरिषदेत शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहिर होणार असल्याची घोषणा करून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. पीक कर्जाव्यतिरिक्त कुठल्याही कर्जाची माफी केली नसल्याचा आरोप विधान सभेतील विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी करत सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहे.

उपमुख्यंत्री महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अध्यादेश 2020 हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ठेवतील. तर विधान परिषदेत महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा) अध्यादेश, 2020 हे विधेयक सभागृहात मांडतील.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, 2020 चे क्रमांक 1 आणि 4 हे विधेयक नगरविकास मंत्री विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडतील. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास विनिमय) (सुधारणा) अध्यादेश 2020 क्रमांक दोन आणि तीन हे विधेयक पणन मंत्री विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडतील.

त्याचप्रमाणे 2019-20 च्या पुरवण्या मागण्या, सन 2014-2015, 2015-16 व 2016-17 या वर्षाच्या अतिरिक्त खर्चाच्या मागण्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात येतील. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यापालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करण्यात येईल. तसेच विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात येईल.