बाप्पाला उद्या निरोप; चोख बंदोबस्तासाठी मुंबईत ५० हजार पोलीस तैनात

Ganpati Visarjan

मुंबई:- विघ्नहर्त्या बाप्पाचे उद्या गुरुवारी विसर्जन करण्यात येणार असून मुंबईभरातील चौपाट्या आणि तलावांमध्ये विघ्नहर्त्या बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण
मुंबईत ५० हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन सोहळा आणि मिरवणुकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. लालबागच्या राजासह मुंबईत १२९ ठिकाणी बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा बीच आणि मार्वे बीच येथे मोठ्याप्रमाणावर गणेश विसर्जन करण्यात येते.

यावेळी प्रचंड मोठी विसर्जन मिरवणूक निघते. या मिरवणुकीमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. मुंबईत लालबागच्या राजाप्रमाणेच अनेक गणेश मंडळाच्या मिरवणुका निघत असतात. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबईत राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्बशोधक आणि निरोधक पथक, शीघ्रकृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. उद्या गणेश विसर्जनाच्या वेळी चौपाट्यांवर आणि मिरवणुकांमध्ये साध्या वेषातील पोलीस तैनात असतील. महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी हे पोलीस खासकरून तैनात असतील. मुंबईतील सर्व विसर्जनस्थळी सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्यावरूनही देखरेख करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.