
सोलापूर : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत आहे. या आगळ्या-वेगळ्या विवाहाची उद्या सकाळपासून सुरु होणारी धामधूम पंढरपुरकर आणि लाखो भाविकांना घरीच बसून पाहावी लागणार आहे. यंदाचा विवाह सोहळा खास असला तरी कोरोनामुळे भाविकांना सोहळ्यास उपस्थित राहता येणार नाही. या विवाह सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात येत आहे.
या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव सरस्वती, शंकर पार्वती, विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित राहतात, अशी भाविकांची धारणा आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील फुल सजावटीसाठी ३६ प्रकारच्या ५ टन विविध रंगांची फुले वापरण्यात येत आहेत.
यासाठी ६० कामगारांनी राबत फुलांची मंदिरात आकर्षक सजावट केली जात आहे तर वधू – वर अर्थात विठुराया व रुक्मिणी मातेचा विवाहाचा खास पेहराव बंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे. वसंतपंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला व रुक्मिणी मातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असल्याने देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनवण्यात आले आहे. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्यांनी बनविण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला