उद्या सीएएविरोधात कोल्हापुरात महामोर्चा

कोल्हापूर : संविधान बचाव, देश बचाव कृती समितीच्यावतीने एनआरसी, सीएए, एनपीआरच्या विरोधात उद्या सोमवारी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात जिल्ह्यातील सर्व जाती, धर्माचे नागरिक आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार आणि चंद्रकांत यादव यांनी दिली. सकाळी ११ वाजता दसरा चौकातून मोर्च्यास सुरुवात होईल. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जाईल. मोर्च्याचे नेतृत्व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी, प्रा. एन. डी. पाटील, डॉ. जयसिंगराव पवार करणार आहेत.

पंचायत समितीचा अधिकार वाढवणार : हसन मुश्रीफ

काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, डाव्या आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, ‘आप’चे कार्यकर्ते मोर्च्यात सहभाही होणार आहेत. मोर्च्यात कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याला परवानगी नाही. केवळ तिरंगा ध्वज घेऊन वेगवेगळ्या वेशभूषा करून नागरिक सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह बेळगाव, सांगली, सातारा जिल्ह्यातील नागरिकही सहभागी होणार आहेत. मोर्च्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी तावडे हॉटेल, इपी हायस्कूल, खानविलकर पेट्रोल पंप येथे पार्किंग केले जाणार आहे. मोर्च्याची भूमिका पत्रकार परिषदेत नेत्यांनी स्पष्ट केली. केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यामध्ये (सीएए) पाशवी बहुमताच्या आधारे दुरुस्ती केली आहे. कायद्यात केलेली ही दुरुस्ती घटनेतील अनुच्छेद १४ च्या समानतेचा भंग करते. त्यामुळे ही दुरुस्ती संविधानविरोधी आहे. त्याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून तो प्रकट करण्यासाठी मोर्च्याचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले.