
नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government) दळणवळण व्यवस्थेत मोठ्या सुधारणा करून पुढील दोन वर्षांत ‘हाय वे’वरील सर्व टोल बूथ हटविण्यात येणार आहेत. जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून टोल वसुली होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.
टोल प्लाझा हटविल्यामुळे वाहतूक गतिमान होण्यास मदत होणार होईल, हे स्पष्ट करून गडकरी म्हणाले की, जीपीएसद्वारे टोल वसुलीची यंत्रणा उभारण्याची तयारी सरकार करीत आहे. ही यंत्रणा लवकरच अस्तित्वात येईल. तिची अंमलबजावणीही तातडीने सुरू करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याच हाय वेवर टोल बूथ राहणार नाहीत. असोचेम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आर्थिक पुनर्रचनेसाठी राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत मते व्यक्त केली.
मार्च २०२१ पर्यंत सर्व टोलवसुली ३४ हजार कोटीपर्यंत जाईल, जीपीएस प्रणालीतून टोलवसुली सुरू झाल्यानंतर आगामी पाच वर्षांत ही रक्कम एक लाख ३४ हजार कोटी होईल, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.
औद्योगिक विकासाच्या माध्यमातूनच मुबलक रोजगार निर्मिती आणि गरिबी निर्मूलन करता येणे शक्य असल्याचे सांगून गडकरी यांनी औद्योगिकीकरणाच्या विकेंद्रीकरणाची गरज व्यक्त केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला