टोळधाड विदर्भात घुसली

टोळधाड विदर्भात घुसली

पुणे :  पाकिस्तानमधून आलेली टोळधाड मध्यप्रदेशातून मोर्शी, वरूड व मेळघाटात अशी  महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशात घुसली आहे. ती ताशी १२ ते १६ किलोमीटर या वेगाने पुढे सरकते आहे. ती आज मोर्शीनंतर वरूड तालुक्‍यात घुसली होती. टोळधाडीमुळे शेतकरी तसेच संत्रा बागायतदार हादरून गेले आहेत.

टोळधाड पालेभाज्यांसह वृक्षांची पाने खात आहे. लाखोंच्या संख्येस असलेले टोळ पिकांचा फडशा पाडत आहेत. यामुळे विदर्भात पिकांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती आहे. हे नाकतोड्याच्या गटातील तांबूस रंगाचे वाळवंटी टोळ असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

इराण आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे जन्मलेले आणि परिपक्‍व झालेले हे टोळ राजस्थानमधून इतर राज्यांमध्ये घुसले आहेत. महाराष्ट्रात सध्या उन्हाळी मूग, कापूस, उडीद, मका, मिरची, भाजीपाला आणि फळबागातील पिके शेतात आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते, टोळधाडीवर वेळीच नियंत्रण आणले नाही आणि टोळ्यांची संख्या वाढत राहिली तर ते सर्व पिके फस्त करतील. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, रब्बी हंगामातच राज्याच्या काही भागांत  टोळधाड येण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली होती.

कृषी विभागाने महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास मंडळाला या किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. टोळधाडीच्या नियंत्रणाकरिता तज्ज्ञांचे एक पथक पाठविण्यात आले आहे. त्यांच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाईल. सध्या प्रादुर्भाव कमी असल्याने हवेतून फवारणीची गरज नाही, असे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे म्हणालेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER