आरबीआय आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर आज आरबीआय आपलं पहिले पतधोरण जाहीर करणार आहे. यात व्याजदरात 0.25 ते अर्ध्या टक्क्यांची कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कार्यकाळातील हे दुसरे पतधोरण आहे. आरबीआयच्या मुख्यालयात मंगळवारपासूनचं पतधोरण समितीची बैठक सुरू आहे. या बैठकी मध्ये केंद्र सरकारमधील अनेक सदस्यांचाही सहभाग आहे. त्यामुळं नोटाबंदीनंतरच्या या बैठकीत जनतेच्या फायद्याचे निर्णय घेण्यात येतील अशी अपेक्षा केली जातेय.

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळं व्याजदरात मोठी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर रिझर्व्ह बँकेने आज
( बुधवारी) आपल्या रेपो दरात 0.25 किंवा अर्धा टक्क्यांनी कपात केल्यास 6.25 वरुन थेट 6 टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी 5.75 टक्के होण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली,तरी सुद्धा त्याचा सामान्य जनतेला किती फायदा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नोटाबंदी जाहीर झाल्या नंतर रिझर्व बँकेनं काही बँकांसाठी CRR 100 टक्के केला आहे. यामुळे बँकांकडील रोख जमा रकमेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बँकांकडील 3.25 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा झाली आहे.