पेट्रोल, डिझेलचे दर काँग्रेसच्या काळापेक्षा कमी – माधव भंडारी

Todays petrol rate are less than during Congress regime : Madhav Bhandri

धुळे : ‘देशातील पेट्रोल डीझेलचे दर हे काँग्रेसच्या सत्तेपेक्षा आज कमीच’ असल्याचे अजब विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले आहे. पेट्रोल दरवाढीच्या नावाखाली काँग्रेस ढोंग करीत असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून सतत इंधनाची दरवाढ सुरूच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही पुन्हा वाढ झाली आहे. पण ही वाढ त्यांना काही दिसत नसल्याची चर्चा आहे.

राफेल खरेदीवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचे नेते जे आरोप करत आहे ते अतिशय पोरकटपणाचे असल्याचे सांगताना भंडारी म्हणाले, देशाच्या संरक्षण व्यवस्थेला हानी पोहचविण्याचे राजकारण काँग्रेस आणि राहुल गांधी जाणिवपूर्वक करत आहे.

काँग्रेस आपल्या अस्तित्वाचा लढा लढत असल्याचे सांगताना भंडारी म्हणाले, 2019 च्या निवडणुकांमध्ये दारुण पराभव होणार असल्याच दिसत असल्याने ते बिनबुडाचे आरोप करत आहे. त्यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचीही खिल्ली उडवली.

तर आज मुंबईत पेट्रोल 87 रुपये 86 पैसे तर डिझेल 77 रुपये 7 पैसे प्रतिलीटर इतके झाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांध्ये चिंतेचं वातावरण आहे. आज पेट्रोलच्या दरात 32 पैसे तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ झाली आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईने होरपळू लागली आहे.