आजचे अर्जुन जन्मतःच अभिमन्यू

Shailendra Paranjapeकोरोनासह जगण्याची सवय आता आपण सर्वांनीच करून घेतलीय. कोरोनाची तयारी आहे का आपल्याबरोबर राहण्याची, या माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रश्नाचं उत्तर बिचारा निर्जीव कोरोनाचा विषाणू नक्कीच देणार नाहीये. करेल काय बिचारा, अद्याप लस नाही तोवर कोरोना विषाणूलाही आपल्याबरोबर राहावेच लागेल.

कोरोनानं सर्वांनाच काही ना काही शिकवले आहे. व्हाट्स अपवर कोरोनानं (Corona) एक वेगळीच सर्जनशीलता, विनोदनिर्मिती सिद्ध केलीय. तसंच काहींनी काढे विकून हजारो-लाखो कमावले तर काहींनी मास्क (Mask) विकून लोकांची तोंडं बंद केलीत.

काहींना आपल्या भांडी घासण्याच्या अंगभूत कौशल्याचा साक्षात्कारही कोरोनानंच घडवलाय. काहींना पाकशास्त्रात गती असल्याचं लक्षात आणून दिलंय. घराघरांत सासूपेक्षा सुनेचं जास्ती ऐकलं जाऊ लागलंय; कारण सासू ज्येष्ठ नागरिक असल्यानं तुमच्या भल्यासाठीच सांगतेय ना, असं सुनेनं सुनावलं की सासू आणि तिचा घरकामात तरबेज मुलगाही शांत.

या सगळ्यानंतर मिशन बिगिन अगेनमध्ये पुण्यातली हॉटेल्स सुरू झालीत. ती सुरू होताना एक गोष्ट लक्षात आली. हॉटेल व्यावसायिकांच्या पुण्यातल्या संघटनेचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार या हॉटेल्समध्ये अडीच लाख कामगार काम करतात आणि त्यातले ८० ते ९० टक्के गावी गेलेत. त्यामुळे अनेक हॉटेल्स कामगारांअभावी पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेली नाहीत. म्हणजे सरकारने ५० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी दिलीय; पण तेही कामगारांअभावी करता येत नाही, अशी स्थिती आहे.

तसं असेल तर भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या शिवसेनेनं (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) आपल्या खळ्ळं खट्याक करू शकणाऱ्या रिकाम्या हातांना ही रोजगाराची संधी का देऊ नये, असा प्रश्न पडतो. शिवसेना, मनसे किंवा अन्य कोणताही राजकीय पक्ष असो, त्यांच्याकडे नोकऱ्या मागायला येणाऱ्यांची संख्या कमी नाही. हे सारे पक्ष बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यायचं आश्वासनही वारंवार देत असतात.

सध्या हॉटेल व्यवसायात किमान लाखभर किंवा त्याहून जास्ती रोजगारांची संधी असताना हे सारे बेरोजगार आणि त्यांना नोकऱ्यांची आश्वासनं देणारे, महाजॉब्जसारखे पोर्टल, वेबसाईट उद्योग विभागामार्फत सुरू करणारे सरकार आणि पक्ष ही संधी का वाया घालवताहेत, असाही प्रश्न पडतो.

एकीकडं परप्रांतीयांच्या नावानं बोटं मोडायची, प्रसंगी त्यांना मारहाण करायची आणि दुसरीकडे मेट्रोच्या कामासाठी विमानाने मजूर आणायचे, हे कशाचे लक्षण आहे? कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, पगार कमी झालेत, वर्क फ्रॉम होमनंतर कायमचे घरी राहण्याची वेळ आलेलेही कमी नाहीत. तसंच हातावरचं पोट असलेल्यांची अवस्था बघितली तर अराजक माजेल की काय, अशी भीती वाटण्यासारखी स्थिती आहे. तरीही हॉटेल्सना कामगार नाहीत म्हणून सेवा देता येत नाही आणि दुसरीकडे हाताला रोजगार नाही म्हणून लोक तोंडं बारीक करून बसलेत, हा विरोधाभास नेमका कशामुळं आहे?

पक्षकार्य करायला आलेल्यांना आधी पोटाचं बघा, स्वतःच्या पायावर उभे रहा आणि मग या राजकारणात, असं सांगण्याचं धैर्य आपले राजकीय पक्ष आणि त्यांचे अतिक्वालिफाइड नेते कधी सांगणार? ‘अर्जुन’ चित्रपटातला बाबूराम म्हणजे अन्नू कपूर शेवटी एक वाक्य म्हणतो, मिल जाएगा और एक अर्जुन…

गल्लोगल्ली बेकार अर्जुन अभिमन्यू होऊन बेरोजगारीच्या चक्रव्यूहात अडकलेत. जन्मतःच ते या चक्रव्यूहात अडकलेत. त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठीही निर्जीव कोरोना विषाणूनं एक संधी निर्माण करून दिलीय. ती साधायची की पुन्हा निर्जीव विषाणूलाच दोष देत बेकारांची फौज निर्माण होऊ द्यायची, हे कोरोनाबरोबर जगायला शिकलो असू तरच सांगता येईल.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER