आज पंढरपुरात उद्धव ठाकरे डरकाळी फोडणार!

Uddhav

पंढरपूर :- विठोबा हा आमचा आत्मा आहे. हाच तो आमचा देव, ज्याने महाराष्ट्र एकसंध ठेवला. जातीपातीचे भेद गाडले. मात्र ते राजकारण्यांनी उकरून काढले. गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजुरांचा हाच देव आहे आणि त्याच्याच चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो. याच ठिणगीने आज कोरडी झालेली चंद्रभागा खळखळता प्रवाह घेऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरीच्या दौऱ्यावर आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येनंतर आता पंढरपूरातउद्धव ठाकरेंकडून चंद्रभागेच्या तीरी आरती करणार आहे. चंद्रभागेल नमन करुन विठु-माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. आज होणार्‍या उद्धव ठाकरेंच्या महासभेकडे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

राम मंदिर, दुष्काळ आणि संपूर्ण कर्जमाफी हे शिवसेनेच्या अजेंड्यावरचे विषय आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सोमवारी कोणावर तोफ डागणार याविषयी राम भक्त, शेतकरी, कष्टकरी, शिवसैनिक, वारकरी संप्रदाय आणि साधू-महंतांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून उद्याची महासभा ही ‘न भूतो न भविष्यती’ असेल आणि उद्या आषाढी वारी भरेल असा आत्मविश्वास शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला.

यावेळी कदम म्हणाले, “राममंदिराचा प्रश्‍न हा शिवसेनेने ऐरणीवर आणला आहे. यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला देशभरातून प्रतिसाद मिळाला आहे. आता याच प्रश्‍नांवर ठाकरे दक्षिण काशी असणार्‍या पंढरपूर मधून एल्गार पुकारत असून राज्याचे व देशाचे आता या तीर्थक्षेत्राकडे आहे. गेली तीस वर्षे हा प्रश्‍न प्रलंबित आहे. राममंदिर उभारणीसाठी विटा देखील गोळा करण्यात आल्या पण अद्याप मंदिर झालेले नाही.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आल्यावर कायदा करून राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करता आला असता पण अद्याप हे पाऊल उचलले नाही. भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नेहमीच मंदिराचा प्रश्‍न पहिल्या दहामध्ये राहिला आहे मात्र आता ते सत्तेत असून ही मंदिरासाठी कायदा का करीत नाहीत?” असा सवाल रामदास कदम यांनी केला.

ते म्हणाले, “भाजपने जनतेचाच नाही तर त्यांना सत्तेत आणणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही विश्‍वासघात केला आहे. आता राममंदिर उभारणीसाठी शिवसेनेने पहिले मंदिर फिर सरकारचा नारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सोमवारी २४ रोजी पंढरीत येत असून ते सायंकाळी चार वाजता चंद्रभागा मैदानात आयोजित महासभेस संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी वारकरी संप्रदायातील हभप देवदत्त वासकर महाराज व हभप जयवंत बोधले महाराज हे दोघे या सभेत आपले विचार व्यक्त करणार आहे.”

ही बातमी पण वाचा : सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी पंढरपूरातून क्रांतीची ठिणगी पडेल! – उद्धव ठाकरे

महासभेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. याप्रसंगी खासदार संजय राऊत, राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खा.अनिल देसाई, खा.अरविंद सावंत, आमदार तानाजी सावंत, रवींद्र निर्लेकर, मीनाताई कांबळी, संजना घाडी, विशाखा राऊत, संतोष माने, संभाजी शिंदे जिल्हा प्रमुख गणेश वानकर संपर्क प्रमुख महिला आघाडी संजनाताई घाडी, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे जिल्हा महिला संघटक अस्मिता गायकवाड, शैलाताई स्वामी महिला सन्मवयक सोलापूर जिल्हा, उज्वला येलूरे महिला आघाडी संघटक, साईनाथ अभंगराव उपजिल्हा प्रमुख, सुधीर अभंगराव शहर प्रमुख रवि मुळे तालुका प्रमुख, महावीर देशमुख,अतुल राजूरकर युवासेना संहसंपर्क प्रमुख विनोद कदम आदी उपस्थित होते.