आज रोहित-राहुल यांच्यात होईल स्पर्धा, मुंबई आणि पंजाबमध्ये गुणांसाठी होईल संघर्ष

Kl Rahul VS Rohit Sharma

आयपीएलच्या १३ व्या सत्राच्या १३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब गुरुवारी अबू धाबी येथे आमने-सामने येणार आहेत. मागील सामन्यात चांगली कामगिरी करूनही पराभवाला सामोरे जाणारे दोन्ही संघ सामन्यातील छोट्या छोट्या चुका टाळून लय मिळवण्याचा प्रयत्न करतील. हा सामना अबूधाबी येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता खेळला जाईल.

किंग्ज इलेव्हन संघाने राजस्थान रॉयल्सला २२४ धावांचे लक्ष्य दिले, परंतु ते त्याचा बचाव करू शकले नाहीत. संघासाठी हा धक्का होता. दुसरीकडे, किरोन पोलार्ड आणि ईशान किशनच्या शानदार डावामुळे मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध २०२ धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सुपर ओव्हर मध्ये दोन गुण गमावले.

MI vs KXIP: आकडे काय म्हणतात ..?

आयपीएलच्या विक्रमाविषयी सांगायचे तर मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात २४ सामने (२००८-२०१९) झाले आहेत. मुंबईने १३ सामने आणि पंजाबने ११ सामने जिंकले आहेत.

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना गमावला परंतु कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून पुनरागमन केले. तथापि, आरसीबीविरूद्धच्या छोट्या चुकांमुळे त्या चुका त्यांनाच भारी पडल्या.

हीच परिस्थिती किंग्ज इलेव्हनची आहे. दिल्ली कॅपिटल्स सोबत पहिला सामना गमावल्यानंतर आरसीबीविरुद्ध आपले खाते उघडले होते. पण रॉयल्सविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी करूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

पंजाबचे गोलंदाज रॉयल्सविरूद्ध त्यांच्या लयीत दिसले नाहीत. शेल्डन कॉट्रेलच्या एका षटकात राहुल तेवतियाची पाच षटकार याचा पुरावा आहे. अगदी फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद शमीने चार षटकांत ५३ धावा केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. लेगस्पिनर रवी बिश्नोई वगळता अखेरच्या सामन्यात कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नाही.

किंग्ज इलेव्हनने अद्याप स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला संधी दिली नाही, परंतु राहुल आणि मयांक अगरवाल यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची फलंदाजी मजबूत दिसते. मुंबईला सामना जिंकायचा असेल तर राहुल आणि मयांकला स्वस्तात बाद कराव लागेल. राहुल आणि अग्रवाल या दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतक ठोकले आहे. रॉयल्सविरुद्ध पहिल्या विकेटसाठी त्यांनी १८३ धावांची भागीदारी केली.

मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी विभाग बर्‍यापैकी संतुलित दिसत आहे. त्यांच्याकडे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन सारख्या फलंदाजांचा समावेश आहे. त्यानंतर पोलार्ड आणि हार्दिक पंड्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत.

त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा फॉर्म मुंबईसाठी अजूनही चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव दिसून आला आहे. बुमराहने तीन सामन्यांत तीन गडी बाद केले असून तो प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे. मुंबईच्या संघाने अबू-धाबीच्या मैदानावर यापूर्वी सामने खेळले असून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या मैदानावर त्यांनी आपले पहिले दोन सामने खेळले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER