महाशिवरात्रीनिमित्त आज राज्यभरात ‘ठाकरे’ सरकारची स्पेशल ‘शिव उपवास थाळी’

-shivbhojan-scheme thali

नगर : महाशिवरात्रीनिमित्त आज (शुक्रवारी) राज्यभरात शिवभोजन थाळीत गरजूंना फराळाचा आस्वाद घेता यावा, यासाठी थाळीत बदल करण्यात आला आहे. त्यात शेंगदाण्याची आमटी, राजगिऱ्याचा भात- चपाती, बटाट्याची भाजी या पदार्थांचा समावेश असणार आहे. केंद्रचालकांना थाळीत उपवासाचे मेनू निश्‍चित प्रमाणातच द्यावे लागणार असून, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने गरजू मात्र सुखावणार आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त शासनादेशाची पूर्ण दक्षता घेत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उचललेले पाऊल दिशादर्शक ठरणार आहे. गरजूंची मागणी लक्षात घेता, त्या त्या शहरात मंजूर केलेल्या शिवभोजन थाळीत प्रशासनाने प्रत्येक केंद्रांवर २०० थाळ्यांची वाढ केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभर निष्ठेने उपवास केला जातो. महाशिवरात्र, आषाढी एकादशीच्या दिवशी बहुसंख्य लोक उपवास करतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाशिवरात्रीला शिवभोजन केंद्रात उपवासाचे पदार्थ मिळतील का, अशी चर्चा होती. त्यावर शासन निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करीत, निश्‍चित प्रमाणात महाशिवरात्रीच्या शिवभोजनाची सुविधा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यात शिवभोजन योजनेत एखाद्याला नियमित जेवण करायचे असेल, तर तेही मिळणार आहे.