‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, आज असंख्य गुजराती बांधव शिवबंधनात अडकणार

Gujarati brothers will get stuck in Shivbandhan

मुंबई: ‘केम छो, वरळी’ म्हणत विधानसभा निवडणुकीत गुजराती मतदारांना साद घातल्यानंतर आता शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा’ असा नारा दिला आहे. या निमित्ताने शिवसेनेने 2022मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज शिवसेनेकडून जोगेश्वरीतील गुजराती समाज भवनात गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी असंख्य गुजराती बांधव (Gujarati brothers)शिवबंधनात (Shivbandhan)अडकणार आहेत.

मागच्या निवडणुकीत गुजराती मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतांचं भरभरून दान टाकल्यामुळे हा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेने ढोकळा आणि वडापावची भट्टी जमविण्यास सुरुवात केली आहे. आता पालिका निवडणुकीत ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातलीय. भाजपच्या व्होट बँकला सुरुंग लावण्याची शिवसेनेची ही खेळी असल्याचं जाणकार सांगतात.

30 गुजराती मतदार मैदानात उतरवणार?

2017च्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक फटका मुलुंड आणि अंधेरी पश्चिममध्ये बसला होता. या भागातील भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले होते. या भागात गुजराती मतदारांचं सर्वाधिक वर्चस्व आहे. त्यामुळे गुजराती मतदारांनी शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला. त्याशिवाय गिरगावसह उपनगरातल्या गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, घाटकोपर आदी भागातही शिवसेनेला मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे 2022च्या निवडणुकीत गुजराती मतदारांना आपलंस करण्यासाठी शिवसेनेकडून जास्तीत जास्त गुजराती उमेदवारांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. 2022मध्ये शिवसेना 227 पैकी 30 जागांवर गुजराती उमेदवार मैदानात उतवरण्याची शक्यता आहे. गिरगाव, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, घाटकोपर, अंधेरी, मुलुंड, विलेपार्ले आदी गुजराती बहुल मतदारसंघातच हे उमेदवार शिवसेनेकडून मैदानात उतरवून भाजपला जशास तसे उत्तर दिलं जाऊ शकतं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER