पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस

PM Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला होता. मोदी यांच्या वाढदिवसाच्या (Birthday Wishes) निमित्ताने 14 सप्टेंबरपासून भाजप एक आठवड्याचं सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सेवा कार्य केले जात आहे.

मोदींचा राजकीय प्रवास :

गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास आहे. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. बालपणापासूनच त्यांचा ओढा संघाकडे होता आणि गुजरातमध्ये आरएसएसचा मजबूत आधारही तेच होते. 1967 मध्ये वयाच्या 17 वर्षी ते अहमदाबादला आले आणि त्याच वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बनले. यानंतर 1974 मध्ये ते नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाले. अशाप्रकारे सक्रिय राजकारणात येण्याआधी नरेंद्र मोदी अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रचारक होते.

2001 मध्ये केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं. डिसेंबर 2002 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी विजय मिळवला होता. यानंतर 2007 च्या विधानसभा निवडणुका आणि मग 2012 मध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने गुजरातमध्ये निवडणुका जिंकल्या. त्यांच्याच कार्यकाळात गोध्रा जळीतकांडही घडलं होते .

तर 2014 मध्ये ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. एकट्या भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. एवढंच नाही तर उमेदवार म्हणून मोदींनी वाराणसी आणि वडोदरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही मतदारसंघात त्यांचा विजय झाला. मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील विजय 2014 पेक्षा फारच मोठा होता. या निवडणुकीत भाजपने तब्बल 303 जागांवर विजय मिळवला. 30 मे 2019 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER