पूरग्रस्तांना भरीव व तातडीने मदत देणार : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar

चंद्रपूर: मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे (Sanjay sarovar Project) पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील हजारो हेक्टर धान शेतीसह अनेक गावे पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी स्वत: ब्रह्मपुरी व सावली भागाची सतत तीन दिवस बोट व हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विस्थापित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

आपद्ग्रस्तांना भांडी व कपड्यांसाठी पाच हजार रुपये व अन्नधान्यासाठी पाच हजार रुपये याप्रमाणे प्रति कुटुंब दहा हजार रुपये प्रारंभिक तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यानी सांगितले. पहिले पाच व नंतर पाच असे एकूण १० हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे.

पूरग्रस्तांना ही प्राथमिक मदत असली तरी सर्व्हेअंती भरीव मदत देण्यात येणार आहे. यात १०० टक्के घरे पडलेल्यांना ९५ हजार रुपये, घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, शेतीच्या नुकसानकरिता प्रति हेक्टर १८ हजार रुपये, जनावरे मरण पावल्यास त्याची वेगळी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

सन १९९५ पेक्षाही पुराची पातळी भीषण आहे. श्री.वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील बोरगाव, पारडगाव, बेटाळा, कोलारी, भालेश्वर, नवरगाव, बेटगाव, अहेर, रनमोचन तर सावली तालुक्यातील करोली, निमगाव, बोरमाळा या गावांसह पूरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची, पडलेल्या घरांची पाहणी केली व आपदग्रस्त नागरिकांसोबत, शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला.

पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून तातडीने प्रत्यक्ष सर्व्हेक्षण व पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सर्व गावा-गावात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्व्हेक्षण व पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

पुरामुळे गावागावात गाळ साचला असल्याने गाळ तातडीने काढून ब्लिचिंग पावडर टाकण्याचे व आपादग्रस्त गावात तातडीने आरोग्य शिबिर घेऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिले.

सर्व्हेक्षण करीत असताना कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन प्रत्यक्ष तपासणी व पंचनामे करून अहवाल तयार करावा. या पुरात मत्स्यपालन, कुक्कुटपालन यांचे सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांचासुद्धा उल्लेख करण्यात यावा अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी सभापती विजय कोरेवार, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार सागर कांबळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, तालुका कृषी मंडळ अधिकारी रामाराव वाघमारे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावचे सरपंच तसेच खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, विलास निखार, नितीन उराडे, देवीदास जगनाडे, नानाजी तुपट, हितेंद्र राऊत, दिनेश चिटनूरवार, यशवंत बोरकुटे, उर्मिलाताई तरारे उपस्थित होते.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER