भाजपाला सत्तेपासून रोखा : सचिन पायलट

Sachin Pilot

नांदेड: देशामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नि:पक्षपातीपणे काम करणाऱ्या न्यायव्यवस्थेमध्येसुद्धा ढवळाढवळ शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे देशात भीतीचे व दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे भयमुक्त भारत निर्मितीसाठी भाजपला सत्तेपासून रोखा, असे आवाहन राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी येथे केले.

खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपने दलित, अल्पसंख्याक, महिला, व्यापारी व पत्रकार यांच्यावर अन्याय करण्याची मालिका सुरू केल्याचे सांगताना पायलट म्हणाले, या शासनाच्या काळात वेगवेगळ्या घटकांवर दबाव टाकला जात आहे. सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने देशवासीयांशी दगाबाजी केली आहे. मूळ विषयाला बगल देऊन ताजमहल, पद्मावती, गोमांस, राम मंदिर असे विषय समाजापुढे मांडले जात आहेत. ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल व याचा लाभ भाजपला होईल, याची काळजी शासनाकडून घेतली जाते.

देशामध्ये दहशत निर्माण करून सत्ता पुन्हा एकदा हस्तगत करण्याचा इरादा भाजपचा जरी असला, तरी आगामी सर्व निवडणुकांमध्ये जनता त्यांना निश्चित जागा दाखवेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. नोटबंदी करून नरेंद्र मोदी यांनी देशाला २० वर्षे पाठीमागे नेले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. दलित आणि महिला यांवरील होणारे अत्याचार ही शरमेची बाब झाली असल्याचे ते म्हणाले. मुलींवरील अत्याचारांमध्ये भाजपच्या आमदाराचा सहभाग आहे. यावरून हे सरकार गुंड प्रवृत्तींना प्रोत्साहन देते हे दिसते. या सभेत खासदार अशोक चव्हाण, मोहन प्रकाश, खासदार राजीव सातव, आमदार नसीम खान, डी.पी.सावंत, इमरान प्रतापगढी आदींची या वेळी भाषणे झाली. नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील नवा मोंढा मदानावर एका जाहीर सभेचे आयोजन केले होते.