“जाणता “घडण्यासाठी .(भाग-2.)

Mansi

हाय फ्रेंड्स ! आपण काल “जाणता “जाणीव असलेला ,आयुष्य जगताना काय कमवायला हवं आणि कसं कमवायला हवं याची जाणीव असलेला . आशा व्यक्तीमत्वाप्रत मार्गक्रमणाविषयी बोलत होतो. या विषयाला एवढे पैलू आहेत ,की कुठल्याही पैलू बाबत बोलायचे म्हटले ना कि लेखणी धावायला लागते तुमच्याशी संवाद साधण्यासाठी ! कारण तुमच्या ,माझ्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित छोट्या, छोट्या गोष्टी यात आठवत जातात. काल आपण बघितलं कि “चार पावसाळे जास्त पाहणाऱ्याकडून”, आपण जे’ ऐकतो’ या शब्दाला किती छटा आहेत आणि त्यांचा आपण कसा वापर करत असतो की जेणेकरून आयुष्याची पायवाट सोपी होऊ शकते.

आज मी ज्या टप्प्यावर उभी आहे, तेथून थोडं मागे वळून बघितलं ,तर खूप बहुरंगी वाटा मला दिसायला लागतात. अरे ! मी इथून आले. हो !आणि पुस्तकांच्या सोबतीने मी केलेल्या प्रवासाची पायवाटही दिसते. अगदी तिथून मी या प्रवासात हमरस्त्याला लागले ,त्यापूर्वी माझा पाय त्या दलदलीत काही काळ फसला होता, आणि मग त्या रस्त्याचे वर्णन करायला लेखणी धावायल लागते.

फ्रेंड्स ! काल आपण ज्ञानाच्या संदर्भात बोलतानाही वाचनासंबंधी बोललो होतो. वाचनातून माणूस घडतो हे नक्की ! यावर बोलू या असही म्हणलो होतं.आपल्या इंग्रजी वर्षाचा शेवट ,नव्हे उद्याच्या नवीन दिवसाची पहाट ! ती कशी असावी ? प्रत्येक जण काही तरी संकल्प करत असणार. कुणाचा विचार झाला असेल. मीही काही एक संकल्प केला आहे. पण तो करण्यामागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावीशी वाटते आहे. माझा वाचन प्रवास कसा झाला ? तो मला चांगला आठवतोय. किंबहुना तुमच्यापैकी प्रत्येकाचा असाच झाला असेल. अगदी लहानपणी चांदोबा, किशोर ,छोटी छोटी गोष्टीचे पुस्तक ,जादूची पेटी ,देिव्यातला राक्षस, मग टारझन ,राजू प्रधानच्या गमती जमती, सिंदबाद , गोट्या यांच्याशी झालेल सख्य. त्यावेळी “मुलांचे मासिक” म्हणून एक निघत होते . असा प्रवास चालू झाला. त्याचबरोबर पुढे राजा शिवछत्रपती, एक होता कार्व्हर,नंतर माझे बाबा मुख्याध्यापक, त्यामुळे शाळेच्या लायब्ररीत येणारी स्त्री, किलोस्कर, मनोहर ही मासिके आणि म. टा. वाचायला सुरुवात झाली. कॉलेजच्या दिवसांमध्ये नेहमीप्रमाणे सुमती क्षेत्रमाडे ,योगिनी जोगळेकर, ना .सी .फडके या वाचनात गेले. मराठीत एम.ए.करत असताना कुसुमाग्रज ,तांबे, नारायण सुर्वे, केशवसुत, गडकरी भेटत गेले. तसेच मोरोपंत ,एकनाथी भागवत ,दासबोध असे बरेच वाचनात येत गेले. लग्नानंतर ट्रॅक बदलला. काही वर्ष बालसंगोपन ,आहारशास्त्र, आयुर्वेद या वाचनात गेला. मिस्टराना वाचायची खूप आवड. पण मला नाही जमायचं म्हणा, किंवा मन नाही लागायचं. वाचन झाले फक्त विषयाशी आणि व्यवसायाशी संबंधित, मानसशास्त्राचे. नंतर अचानक एक ग्रुप मिळाला” पुस्तक प्रेमी “नावाचा! सगळ्या महाराष्ट्रातले अतिशय छान वाचक, लेखक ,चित्रकार आणि सगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत त्यात. एक आठवडाभर त्यांच्या पद्धतीप्रमाणे दररोज एका पुस्तकाचे पुस्तक परीक्षण लिहायचे होते .ती संधी मिळाली आणि नंतर एकेकाची परिक्षणे, इतर लेखन-वाचन होत गेले. आणि जाणवायला लागलं ,अरे !लोक काय काय वाचत आहेत .किती सुंदर लिहीत आहेत. विविधरंगी अनुभव घेत आहेत. आधी मला इंग्लिश पुस्तकांचे भाषांतरे नाही आवडायची. पण आता भाषांतरित पुस्तकानसोबतच चक्क इंग्लिश नॉव्हेल्स कडेही ओढा झालाय. तरीही ह्यांचं वाचन दांडगे असल्याने घरात सगळी इंग्लिश पुस्तक आहे .मध्यंतरी वाचन होत नसलं तरी पुस्तक प्रदर्शनाला भेट देणे हा माझा आवडता छंद आहे. त्यामुळे बऱ्यापैकी कलेक्शनही आहे. सोने , नाणे आणि कपडे यापेक्षा पुस्तकात invest करायला आम्हाला दोघांनाही आवडतं.

मुलांना मात्र त्या त्या वयाला अनुरूप व आवश्यक अशी पुस्तकं जाणीवपूर्वक पुरवत गेल्याने मुलांचे वाचन झाले .ते चांगले वाचक आहेत.

याचा फायदा काय झाला? तर करमत नाही असं मला होत नाही. कधीही कुणी नसलं तरी एकटे वाटत नाही. समुपदेशनासाठी येणार्या व्यक्तीचे कुठलेही क्षेत्र असले तरी त्याच्याशी जवळीक(Rappot) निर्माण करण्यासाठी मला विषय असतात. समोरच्या माणसाला समजून घेण्यासाठी मला पुस्तक मदत करतात. माझ्यातले दोष समजून घेऊन ,मान्य करून ते दूर करण्यासाठी मला त्यांचीच मदत झाली, इतरांशी जुळवून घ्यायला मला मदत झाली. जीवनाच्या अनेक पैलूंची ओळख होण्यासाठी मला उपयोग होतो. एखाद्या गोष्टीवर अनेक दृष्टिकोनातून बघायला मला मदत होते. सृष्टीची विविधता, व्यक्तींमधील विविधता, प्रदेशांनुरूप भिन्नता ,माणसा-माणसांच्या स्वभावातील बारकावे अनुभवायला आणि एन्जॉय करायला मिळतात. वर सांगितल्याप्रमाणे आपल्या वयाच्या अनुसरून आपल्या वाचनाची आवड बदलत जाते, तसतशी प्रगल्भता येते.
आपण जेव्हा थोरामोठ्या बद्दल वाचतो किंवा ऐकतो तेव्हा लक्षात येते की त्यांनी जास्तीत जास्त वाचलय, ऐकलंय, बघितलं आहे आणि अनुभवल आहे. या सगळ्या जगाच्या पाठशाळेतून त्यांचे आयुष्य घडत गेलं. म्हणजे काहीही गायक, नट ,लेखक या सगळ्यांनीच लहानपणी एक तर मोठ्या लोकांचा सहवास या ना त्या निमित्ताने अनुभवला .आईच्या मांडीवर झोपून त्यांनी पेंगत गाण्याच्या मैफिली ऐकल्या. आजीबरोबर देवळात येणाऱ्या कीर्तनकारांचे कीर्तन आणि भागवत ही ऐकलेला असतं. काहींना अतिशय चांगला असा घरचा सांस्कृतिक वारसा असतो, तर काहीजण अतिशय विपरीत परिस्थितीतून वर आलेले असतात .ही परिस्थिती त्यांना घडवते .एकूण चार भिंतीच्या आत बंदिस्त वातावरणात आपले पाय दलदलीत फसलेल्या प्राण्यासारखे होतात. आणि आपली नजरेची चौकट एवढी साचेबंद होऊन जाते की त्या पलिकडचे जग अनोळखी राहते. मग आपल्यातल्या सर्जनशीलतेला धुमारे फुटणार कोठून ?

म्हणून भरपूर वाचन, भरपूर ऐकणं, भरपूर पहाणं, आणि अनुभव हे चालू ठेवलं तर सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्त्व नक्की घडू शकतं. नाहीतर व्यक्ती तेच ते डबक्यातल जीवन जगत राहते. पाब्लो नेरुदा या जागतिक कीर्तीच्या कवींना साहित्यातला नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांची,”यु स्टार्ट डाईंग स्लोली,”–याचा अर्थ “तुम्ही मरताय हळूहळू “या शीर्षकाची कविता खूप प्रसिद्ध आहे. त्यातील काही ओळी अशा आहेत, “तुम्ही प्रवासाला जात नाही, तुम्ही वाचत नाही काही, जगण्याच्या हाका पडतच नाही तुमच्या कानावर, याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू ! सवयींचे गुलाम बनता आहात तुम्ही, रोज त्याच मळक्या वाटेवर चालताय तुम्ही, चुकून कधी नव्या रस्त्याने जाऊन पहात नाही, चुकून कधी वाट चुकत नाही. परक्या अनोळखी माणसाला भेटत नाही, अंगावर चढवत नाही नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग, याचा अर्थ तुम्ही मरताय हळूहळू .” हे त्याचे भाषांतर! किती नेमक्या शब्दांमध्ये खूप काही सांगितले त्यांनी. जीवनाला भिडल्याशिवाय आपल्या क्षमतांची ताकद कशी समजणार ? तुम्ही वाचत नाही म्हणजे ? औपचारिक शिक्षण खेरीज अनेक लोक एकही पुस्तक हातात घेत नाहीत. इतक्या मोठ्या जगातले सगळेच प्रत्यक्ष अनुभव आपण नाही घेऊ शकत. ते अनुभव आपण पुस्तकातून घेतो. मी म्हणणारच नाही टाईमपास वाचन करू नका . सगळं वाचा! हातात पडेल ते चीठोर वाचा. त्यांनी चांगलं वाईट यातला फरक कळायला लागेल. आत्मचरित्र त्या मोठ्या माणसाला भेटवतील. त्यांच्या जगण्याच्या वाटा कळतील. विविध पार्श्वभूमीवर आधारित असंख्य पुस्तकं आपल्याला खुणावत आहेत .पण आपण फक्त इन्स्टा आणि मोबाइल गेम्स यावर वेळ घालवणार असू तर वेळ मिळणार कसा?

फ्रेंड्स ! नवीन वर्षाच्या स्वागताला तुम्ही तयार असणारच. माणूस माणसापासून दूर जातोय. एकमेकांना ओळखायचं असेल तर आपल्यातली अंतर दूर व्हावी लागतील, दृष्टिकोनाचे क्षितिज विस्तारायला हवे.

मी माझ्यापुरता एक संकल्प केला आहे. माझे वाचना बरोबरच लिखाणासाठी, जर मला उदाहरणार्थ ऊस तोडणी कामगारांवर लिहायचे असेल तर मला प्रत्यक्ष त्यांच्या जीवनाला भिडावं लागेल. त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल. तेव्हा त्यांचं दुःख ,वेदना, सल वाचकापर्यंत पोहोचेल. हृदयाला भिडेल. तुम्ही काय ठरवताय ? कळवायला विसरू नका. वाट बघते आहे. नववर्षाच्या माझ्या सगळ्या वाचकांना खूप खूप शुभेच्छा !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशन व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER