या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…

Covid - Maharastra Today
Covid - Maharastra Today

Shailendra Paranjapeभविष्यातली युद्धं पाण्याच्या उपलब्धतेवरून होतील, असं काही वर्षांपूर्वी सांगितलं जायचं. पण प्राणवायूवरून युद्धं सुरू होतील, असं कोणालाही कल्पनेतही वाटलं नसेल. विन्स्टन चर्चिल यांनी भारत देश स्वतंत्र होताना आपल्याकडच्या राजकीय नेतृत्वावर भाष्य करत एक शेरा मारला होता की एक वेळ अशी येईल की हे लोक भारतामधे हवेवरही कर लावतील.

चर्चिल तसा द्रष्टाच म्हणायला हवा कारण आज प्राणवायू मिळू शकत नाहीये आणि लस उत्पादन करणाऱ्यांनी देशपातळीवर राज्यपातळीवर आणि खासगी रुग्णालयांना वेगवेगळे दर आकारू असे सांगितले आहे. त्यावरूनही राजकारण सुरू झालेय. अर्थ डे साजरा केला जातोय तो करोनाच्या सावटात. पर्यावरणाला असलेला धोका खरे तर खूप मोठा आहे पण मुळात मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका असेल तेव्हा पर्यावरणाचे धोके दुय्यम वाटू लागतात. मुळात पर्यावरणाची, निसर्गाची आणि आपल्याला निसर्गतः मिळालेल्या वारशाची सुयोग्य जपणूक आणि संवर्धन न केल्यानेच आजच्या बहुतांश समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पृथ्वी टिकवण्यासाठी आता पुन्हा एकदा सर्वांनीच आपापल्या परीने योगदान देण्याची वेळ येऊन ठेपलीय.

आपल्याकडे सर्वच गोष्टींचे सोयीस्कर कप्पे करून बघण्याची सवय समाजमनाला होऊन गेलीय. त्याचे कारण असे की कोणताही विषय आला की अभ्यास करून त्यातली माहिती ज्ञान मिळवण्यापेक्षा या विषयाचा मला कसा काही उपयोग नाही, हे दाखवण्यात लोकांना शौर्य वाटते. त्यामुळेच मग अर्थ डे किंवा पर्यावरण संरक्षण हा काही मूठभर पर्यावरणवाद्यांचा विषय आहे, अशी बहुतांश लोकांची धारणा असते. एखादा तरुण तरुणी पर्यावरणाच्या कामात रस घेत असेल तर असले प्रकार बंद कर आणि अभ्यासाकडे लक्ष दे, या पर्यावरण वगैरे उपक्रमातून नोकरी धंदा, उपजीविकेचे साधन मिळणार आहे का, ही पालकांना चिंता असते. तीच गोष्ट खगोलविज्ञान, चित्रकला, नृत्यकला, अभिनयादी कला, कोणत्याही वेगळ्या विषयात रस असला तर त्या व्यक्तीला अपराधी वाटेल, अशी वागणूक देण्यातच इतरांना शौर्य वाटते, हे सामाजिक वास्तव आहे.

थोडक्यात करोना असो किंवा पर्यावरण, आपला काय फायदा ही धारणा असेल तर मग आपण एकेक विषय ऑप्शनलाच टाकत जाऊ. मागच्या वर्षी करोनाची लाट आली तेव्हा गोरगरीब झोपडपट्टीवासिय त्याचे बळी होत होते. तेव्हा परदुःख शीतल या न्यायाने अनेकांनी स्वतःला कोषात कोंडून घेऊन आपल्याला काही होणार नाही, असा फुकाचा आत्मविश्वास बाळगला. आता रोजच्या रोज ओळखीचे, बिल्डिंगमधले कोणी तरी, सोसायटीतले कोणी किंवा नात्यातले कोणी करोनाने आजारी पडू लागले, रुग्णालयात दाखल हऊ लागले, व्हेंटिलेटरवर ऑक्सिजनवर जाऊ लागले की मग शेजारच्या घरातली आग आपल्याकडे कधी तरी येणारच, याचा विसर कसा पडला हा विचार मनात येऊ लागतो. अर्थात, ही पश्चातबुद्धी आहे आणि आत्ता करोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या संपूर्ण व्यवस्थेला या पश्चातबुद्धीने ग्रासले आहे.

स्टिच इन टाइम सेव्ह्ज नाइन, अर्थात वेळच्या वेळी एक टाका घातला तर पुढचे नऊ टाके घालावे लागत नाही, हा या इंग्रजी म्हणीचा अर्थ. खरे तर संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा गेल्या वर्षीच करोनाच्या पहिल्या लाटेत लक्षात आल्या होत्या. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी किमान तयारी तरी करायला हवी होती, ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ती फोल ठरलीय आणि आज आपुले मरण पाहिले म्या डोळा, अशी अवस्था झाली आहे.

आनंद चित्रपटातला डॉ. भास्कर बँनर्जी म्हणजे अमिताभ बच्चन हिरो आनंद म्हणजे राजेश खन्ना याचं कर्करोगानं जवळ येत चालेलं मरण बघून कमालीचा अस्वस्थ होत असतो. डॉक्टर असूनही आपण काही करू शकत नाही, ही तडफड अमिताभने अप्रतिम अभिनयातून दाखवलीय. आज तीच तडफड महाराष्ट्रातल्या विशेषतः नाशिक, नागपूर पुण्यामुंबईतल्या डॉक्टर्स नर्सेस आणि सर्व करोनायोद्ध्यांवर आलीय. हताशपणे त्यांना रोजच्या रोज स्वस्त होत चाललेले मरण बघावे लागतेय. पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालय या सरकारी रुग्णालयात तर शवविच्छेदन करणाऱ्यांवर कामाचा अतिताण येऊ लागलाय. त्यामुळे कविवर्य सुरेश भट यांच्या कवितेतल्या मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, या ओळी सार्थ वाटाव्यात अशी अवस्था येऊन ठेपलीय.

दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जिल्ह्यात आणि पुणे शहरातही जास्ती आहे. त्यामुळे करोनातून वाचलेल्यांनी आता इतरांना आत्मविश्वास देण्याचे काम करायला हवे कारण मरण्यासाठी करोनासह इतर अनेक कारणे असली तरीही जगणंच महत्त्वाचं आहे, हा विचार करोनामुक्त चांगल्या प्रकारे इतरांना सांगू शकतात तोही स्वतःच्या उदाहरणातून. त्यातूनच मग जगण्याने छळले होते, या ओळीऐवजी मंगेश पाडगावकरांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असे वाटू लागेल.

ही बातमी पण वाचा : करोना योद्ध्यांचे सहकारी तरी होऊ यात…

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button