नक्षलवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी 500 कोटीचे ड्रोन विकत घेणार : अनिल देशमुख

गडचिरोली :- जंगलात लपून राहणा-या नक्षलवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि अभियानादरम्यान त्यांच्या शोधमोहिमेसाठी गृहविभागाकडून ५०० कोटी रुपयांचे अत्याधुनिक ड्रोन खरेदी केले जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. नक्षलविरोधी अभियानात पोलिसांना चांगले यश येत असल्याचे ते म्हणाले. गृहमंत्री म्हणून प्रथमच गडचिरोलीच्या दौ-यावर आलेल्या देशमुख यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला भेट देऊन घेतली दिशा कायद्याची माहिती

तत्कालीन सरकारच्या विचारांविरूद्ध जाणा-यांना त्यांनी शहरी नक्षलवादी ठरवून अडकविण्याचा प्रयत्न केला. कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेच्या तपासातही काही लोकांवर आकसपूर्ण कारवाई झाल्याचे देशमुख म्हणाले. या प्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने नेण्यात आला. त्यामुळे कायदेशिर मार्गदर्शन घेऊन या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) केला जाणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले. सेक्शन ६५ प्रमाणे एखाद्या घटनेचा तपास करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पण हे करताना राज्याला विश्वासात घ्यायला हवे होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या सेवेत असलेल्या पवनहंस कंपनीच्या हेलिकॉप्टरच्या भाड्यापोटी सरकारला वर्षाकाठी कोट्यवधी रुपये भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे मागील सरकारने अत्याधुनिक हेलिकॉप्टर खरेदीची प्रक्रिया केली होती. परंतू प्रत्यक्षात ते हेलिकॉप्टर अजूनही गडचिरोलीत दाखल झालेले नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी, आ. धर्मरावबाबा आत्राम, पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मनिष कलवानिया व पोलीस विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.


Web Title : To keep vigil on naxalite state buy rs 500 cr drones : anil deshmukh

Maharashtra Today : Online Marathi News Portal