आझाद यांना नजरकैदेत ठेवणे चुकीचे – जितेंद्र आव्हाड

awahad-meet

मुंबई :- भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझादला नजरकैदेत ठेवणे चुकीचे असून तो काही गुन्हेगार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आझाद यांची भेट घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
“त्याला हॉटेलमध्ये डांबून ठेवणे चुकीचे आहे. राज्यात त्याच्यावर एकही गुन्हा नाही. तरीही त्याला डांबून ठेवण्यात आले आहे. संविधान मानणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशी कारवाई करणे हा संविधानाचा अपमान आहे”, अशी टीका आव्हाड यांनी केली. आव्हाड यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला.

भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी धरपकड करण्यात आली आहे. 1 जानेवारीच्या शौर्य दिनाच्या पाश्र्वभूमीवर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेख आझाद शुक्रवारी मुंबईत दाखल झालेत.

शुक्रवारी रात्री चैत्यभूमीला निघालेल्या आझाद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले होते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आझाद यांना नजरकैदेत ठेवले आहे. मालाडच्या मनाली हॉटेलमध्ये आझाद मुक्कामाला आहेत.

मुंबई आणि पुण्यात सभा घेण्याची घोषणा आझाद यांनी केली होती. परंतु, त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे दलित कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. 1 जानेवारीला कोरेगाव-भीमाला जाण्याचा निर्धारही आझाद यांनी बोलून दाखवला आहे.