पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray

मुंबई : जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मला महाराष्ट्रातील पर्यटनाची क्षमता दिसली. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने खूप काही पाहण्यासारखे आहे. या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

मुंबईत कामाचा काही वेळ नसते. तसेच देशाच्या विविध भागातून लोक मुंबई पाहण्यासाठीही येत असतात. त्यांना रात्री-अपरात्री जेवणाची किंवा इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मी नाईटलाईफची संकल्पना आणली. कॅबिनेटमधून बाजूला ठेवायचे असेल तर जी खाती दिली जातात, ती खाती मी मागितली. या खात्यांमार्फत मला चांगले काम करण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, वीकेंडला मुंबईत येणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशावेळी हॉटेल, रेस्टॉरंट, थिएटर या सोई त्याठिकाणी उपलब्ध असाव्यात, म्हणून नाईट लाईफ गरजेची आहे. जगभरातील इतर देशांमधील अनेक शहरे रात्रंदिवस जागी असतात. मग आपण मुंबईवरही विश्वास टाकला पाहिजे. मुंबईकर रात्रभर नुसता गोंधळ घालणार नाहीत. मुंबईकरांवर विश्वास न ठेवणे हा मुंबईकरांवर अन्याय आहे, असे ते म्हणाले.

वरळी सीफेस येथील समुद्रातील भराव कार्य थांबवा, आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

डोंबिवली येथील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, उद्योगांना पर्यावरणासंबंधीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न झाल्यास संबंधित कंपन्यावर कारवाई केली जाणार आहे. पर्यावरणाची कोणतीही हानी सहन केली जाणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.

मुलींवरील अत्याचाराबाबत बोलतानाआदित्य ठाकरे म्हणाले, याप्रकारच्या घटना रोखण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार ठोस पावले उचलत आहे. कायद्यानुसार आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे विकृत मानसिकता बदलणेही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

वातावरणातील बदलांमुळे मोठे आव्हान पर्यावरण खात्यासमोर आहे. पर्यावरण खात्यामार्फत प्रत्येक नागरिकामध्ये वातावरण बदलांबद्दल जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध माध्यमांतून स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून प्रयत्न सुरु आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.