करोना योद्ध्यांचे सहकारी तरी होऊ यात…

Corona Warriors - Remdesivir - Editorial

Shailendra Paranjapeरेमडिसिव्हरच्या (Remdesivir) उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकारने (Central Government) उत्पादनवाढ करायला तसेच किमती नियंत्रित ठेवण्यास सांगितले आहे. तीच गोष्ट राज्य सरकारची आहे. सरकार खासगी कंपन्यांना असे सांगू शकते कारण कररचनेत बदल करून आणि इतर अनेक मार्गांनी कंपन्यांवर आर्थिक बोजा टाकण्याची ताकद सरकारांमधे असते. देशात किंवा राज्यात युद्धजन्य स्थिती करोना (Corona) रोगाने निर्माण केलेली असल्याने सरकारने कंपन्यांना रेमडिसिव्हरच्या किमती अवाक्यात ठेवायला सांगणे, हे व्यापक जनहितासाठी उचललेले पाउल असते.

रेमडिसिव्हर असो की प्लाझ्मादान किंवा रक्तदान, मुळात आरोग्यविषयक यंत्रणा या सर्व बाबतीत गेल्या वर्षीच्या करोनाच्या पहिल्या लाटेतच उघड्या पडल्या होत्या. सरकारी यंत्रणांच्या मर्यादाही समोर आल्या होत्या. सरकारने फक्त आणि फक्त आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी लोकांपर्यंत वाजवी दरात पोहोचतील, इतकी जबाबदारी पार पाडावी, ही अपेक्षा गैर नाही. पण सरकारला इतर अनेक विषय जास्ती महत्त्वाचे असल्याने हे होत नाही. तसेच नागरिकही केवळ हक्कांबद्दल जागरूक असल्याने आणि आपल्या नागरिक म्हणून जबाबदाऱ्यांबद्दल गहाळ किंवा हलगर्जी असल्याने करोना किंवा अन्य संकटे वारंवार आक्रमण करताना दिसतात.

वास्तविक, दुष्काळाच्या वेळी सरकार खासगी विहिरी अधिग्रहित करते म्हणजे ताब्यात घेते. पाणी कोणीच आपल्या घरात निर्माण करत नसल्याने विहिरी किंवा पाण्याचे स्त्रोत ही सरकारी मालमत्ता आहे आणि तिचे वाटप समन्यायी पद्धतीने व्हावे, हा त्यामागचा उद्देश्य असतो. तीच गोष्ट आरोग्य आणीबाणीच्या वेळी किंवा करोनासारख्या साथीच्या युद्धजन्य परिस्थितीच्या वेळी का केली जाऊ नये, हा प्रश्न पडतो. म्हणजे असे की खासगी कंपन्या किंवा कारखाने असले तरीही एखाद्या कारखान्याची उत्पादनक्षमता किती आहे, तेथे किती लोक काम करतात हे लक्षात घेऊन संपूर्ण उत्पादनाचा ताबा सरकारने घेतला तर किमान काळाबाजार टाळता येईल आणि पारदर्शक पद्धतीने खऱ्या गरजवंतांपर्यंत रेमडिसिव्हर, प्लाझ्मा किंवा रोग्यविषयक बाबी पोहोचू शकतील.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांना करोना झाल्यानंतर रुग्णालयात लगेचच जागा मिळू शकली नाही, अशी बातमी आलीय. ही गोष्ट रुग्ण म्हणून त्यांच्यादृष्टीने काळजीची बाब असली तरी करोनानं सगळ्यांना एका रांगेत आणून ठेवल्याची पुन्हा एकदा साक्ष पटलीय. रेमडिसिव्हरचा तुटवडा भासू लागलाय तसाच तो आता करोनावरच्या लशींचाही भासू लागलाय. पुण्यात करोनाचं चित्र आणखी भयावह होत चालले आहे आणि ससून या सरकारी रुग्णालयातल्या शवागाराबाहेर शवविच्छेदनासाठी रांगेने मृतदेह ठेवावे लागताहेत आणि शवागारातल्या कर्मचाऱ्यांना अविरतपणे काम करावे लागत आहे, हे लक्षात घेऊन तरी लोकांनी घराबाहेर विनाकारण पडू नये, हे लक्षात घ्यायला हवे.

फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे एखाद्या मंगल कार्यालयाचे, हॉलचे, मैदानाचे रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयात करायचे तर खाटा, तपासण्या करायची यंत्रे आणि इतर सुविधा देता येतात पण तज्ज्ञ डॉक्टर किंवा परिचारिका कोठून आणणार, हा खरा प्रश्न आहे. गेल्या वर्षीही तज्ज्ञ डॉक्टरांप्रमाणेच विद्यार्थी डॉक्टरांनीही, निवासी डॉक्टरांनीही सर्वच सरकारी रुग्णालयांमधे अविरतपणे सेवा बजावली होती. त्याबरोबरच महापालिकेच्या रुग्णालयांमधे डॉक्टर, परिचारिका यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांनीही मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी किमान करोना ही युद्धजन्य स्थिती आहे, हे लक्षात घेऊन या सर्व करोना योद्ध्यांवरचा ताण आपल्यामुळे वाढणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

सध्या सर्व रुग्णालयांमधे करोनासाठी बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही अशा बातम्या येत असताना करोना चाचणीचे निष्कर्ष येईपर्यंत बाहेर न फिरणे, केवळ आणि केवळ डॉक्टरी सल्ला असेल तरच रुग्णालयात दाखल होण्याचा आग्रह धरणे, गृहविलगीकरण पुरेसे असेल तर ते कसोशीने पाळणे, हे आपण सर्वांनी करायलाच हवे. करोना काळात करोना योद्धे होऊ नाही शकलो तरी किमान योदध्यांचे सहकारी व्हायला काय हरकत आहे. करोना सुसंगत वागणे म्हणजे एक प्रकारे करोना योद्ध्यांचे सहायक होण्यासारखेच आहे. आपण सारे किमान ते तरी करू यात.

ही बातमी पण वाचा : कृष्णमेघालाही आहे रूपेरी किनार…

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button