थकलेले पक्ष, थकलेले नेते

Sushilkumar Shinde

badge‘आम्ही थकलो. शरद पवारही थकले. पुढेमागे दोन्ही काँग्रेस एकत्र येतील’ असे सांगून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय आल्याने फारसे कुणी खुलून बोलणार नाही. शरद पवार तर वयाच्या ७८ व्या वर्षीही आपण तरुण असल्याचे सांगत सुटले आहेत. पण काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा, दोघेही थकले आहेत हे अलीकडच्या निवडणुकांमध्ये त्यांना झालेल्या मतदानावरून स्पष्ट झाले आहे. विलीनीकरणासाठी पक्ष शिल्लक असावा लागतो. इथे काँग्रेस आहे कुठे?

हल्लीची काँग्रेस म्हणजे लहानसहान बेटं आहेत. लातूरमध्ये देशमुख आहेत, नांदेडमध्ये अशोक चव्हाण तर कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत. प्रदेशचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात संगमनेरपलीकडे फारसे दिसत नाहीत. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रापुरती होती. आता तर तिथेही तिचे अस्तित्व संकटात आले आहे. उदयनराजेंपासून विजयदादा मोहिते, विखे पाटील या सारखे दिग्गज युतीच्या आश्रयाला गेले आहेत. दोन्ही काँग्रेस पक्ष रिकामे होत आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय असेल.

निवडणुकीला आता प्रचाराला फक्त १० दिवस उरले आहेत. राष्ट्रवादीत फक्त शरद पवार राज्य ढवळून काढत आहेत. काँग्रेसमध्ये तर अजून कुणी घराबाहेरही पडलेले नाही. थोरात, दोन्ही चव्हाण निवडणूक लढत असल्याने स्वतःच्या मतदारसंघात अडकले आहेत. राहुल गांधी विदेशात गेले आहेत. सोनिया गांधी अजून महाराष्ट्रात फिरकल्याही नाहीत. फिरणार कोण? राज्यभर फिरू शकतील असे चेहरेच नाहीत. मोदींना कंटाळून कधीतरी लोक आपल्याकडे येतील ह्या आशेवर काँग्रेसवाले घरी बसले आहेत. काँग्रेस ४-५ जागाही जिंकू शकत नाही असा घरचा अहेर मुंबईचे नेते संजय निरुपम यांनी नुकताच दिला. ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद तर महाराष्ट्र, हरयाणात काँग्रेस जिंकू शकत नाही असे सांगून मोकळे झाले. कुठे १८-१८ तास काम करणारे देवेंद्र फडणवीस आणि कुठे उठसुठ विदेशात पळणारे राहुलबाबा, तब्येतीमुळे दगदग सहन होऊ न शकणाऱ्या सोनिया? दोन्ही काँग्रेस आता रिटायर्ड लोकांचे पक्ष झाले आहेत. त्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याची वेळ आली आहे.