तीरथ सिंह रावत होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री; शपथविधी आजच!

Tirath Singh Rawat

तीरथ सिंह रावत यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षातील अंतर्गत विरोधामुळे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. दुसर्‍या दिवशी भाजपच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपालांकडे शपथविधीसाठी आजच सायंकाळी ४ वाजताची वेळ मागण्यात आली आहे. अर्थात आजच नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

पौडी गढवाल येथे जन्मलेले तीरथसिंग रावत (Tirath Singh Rawat) सध्या पौडी लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. ते उत्तर प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुद्धा होते. त्यांनी १९९७ मध्ये उत्तर प्रदेशातून आमदारकी मिळवली. ते उत्तराखंड सरकारमध्ये शिक्षणमंत्री सुद्धा होते. तीरथ सिंह रावत भाजपचे उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. ९ फेब्रुवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद भूषविले. तत्पूर्वी चौबटखल विधानसभा मतदार संघातून ते २०१२ ते २०१७ पर्यंत आमदार होते. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत.

भाजपने आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष रमण सिंह तसेच राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम यांना आमदार गटाच्या बैठकीचे निरीक्षक म्हणून नेमले आहे. दोन्ही नेत्यांना देहरादूनला बोलावण्यात आले आहे. गेल्या शनिवारी दोघांना भाजपने निरीक्षक बनवून उत्तराखंडमध्ये पाठवले होते. दोघांनी एक रिपोर्ट तयार करून भाजप मुख्यालयात पाठवला होता. तसेच राज्यातील मंत्री आणि आमदार सरकारचा चेहरा बदलण्याची मागणी करत आहेत, असे सांगितले होते. मुख्यमंत्री न बदलल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला नुकसान होईल, असेही या अहवालात सांगण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER