…टाईमपास तिथे कांजूरमार्ग; ‘मेट्रो’वरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई : आरेतील मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयाबाबत ठाकरे सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली – इच्छा तिथे मार्ग, असा एक वाक्प्रचार आहे. मात्र आता – इच्छा तिथे मार्ग, आणि टाईमपास तिथे कांजूरमार्ग असे म्हटले पाहिजे.

ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पक्षाच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणालेत, मेट्रोचे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला. तेव्हा मेट्रो प्रकल्प भूमिगत करण्याचे ठरले होते. काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादीचे (NCP) सरकार जाण्याआधी हा निर्णय घेण्यात आला. आमचे सरकार आल्यानंतर आरेतील केवळ २५ एकर जागा घेऊन कारशेड करण्याचा निर्णय घेतला गेला.

आरेतील कारशेडला विरोध होऊ लागल्याने आमच्या सरकारने कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. एक समिती स्थापन केली. कांजूरमार्गची जागा मिळत असेल तर प्रकल्पाचा खर्च वाढेल. कांजूरमार्गची जागा ‘लिटिगेशन’मध्ये असल्याने ती जागा मिळवण्यासाठी बराच अवधी जाईल. कांजूरमार्गची जागा तीन महिन्यांत मिळणार नसेल, तर मग आरे हाच पर्याय उत्तम असल्याचा अहवाल समितीने दिला होता, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

यानंतर आरेतील कारशेडचे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. २६०० कोटी रेडीरेकनरप्रमाणे जमा करणाच्या सूचना न्यायालयाने दिल्या. या सगळ्यामुळे नऊ महिन्यांचा विलंब झाला. त्यावेळी मेट्रो प्रकल्पातल्या ४० ते ४५ टक्के बोगद्यांचे काम झाले होते. त्यामुळे प्रकल्पाला दिलेली स्थगिती आम्ही हटवली. महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या समितीनेदेखील कांजूरमार्गला कारशेड केल्यास प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर होईल आणि खर्चही वाढेल, असा अहवाल दिला आहे. आरेत कारशेड झाल्यास २०२१ पर्यंत मेट्रो धावू लागेल. पण कारशेड कांजूरला गेल्यास २०२४ पर्यंतही प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही. यासोबतच दरदिवशी व्याजापोटी पाच कोटींचा बोजा पडेल, अशी आकडेवारी फडणवीसांनी दिली.

ठाकरे सरकारने केवळ अहंकारापोटी कारशेडचा प्रकल्प आरेतून कांजूरला नेला, असे फडणवीस म्हणाले. प्रकल्प कांजूरला नेल्याने एक पैसा अधिक खर्च होणार नाही हे मुख्यमंत्री कोणत्या आधारावर सांगतात? आरेमध्ये तुम्ही बांधकामच करणार नाहीत का, याचे उत्तर सरकारने द्यावे. कारण तिथे बांधकाम होणारच आहे. ग्रीन डेपो उभारला जाणार आहे. कांजूरला प्रकल्प नेल्याने खर्च वाढेल असा अहवाल सरकारने नेमलेल्या समितीनेच दिला आहे. हा पैसा तुमच्या घरचा आहे का? जनतेच्या पैशाची लूट करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER