जमाना ‘युज अँड थ्रो’चा !

जमाना युज अँड थ्रो चा

नुकतंच घराचं रंगकाम सुरू करायचं होतं .त्यामुळे आवराआवर करायची ठरवली आणि मी एकेका कप्प्याबरोबर चक्क एकेक तास अडकत होते. मुले आता खूप मोठी झालेली. त्यामुळे ती आता शिक्षणात आणि नोकरीत मग्न. परंतु मी मात्र अजूनही त्यांचे शंखशिंपले , रंगीत गोट्या, पेन्सिली यात अडकलेली आहे. म्हणूनच आवर आवर म्हणजे केवळ ह्या कपाटातून त्या ड्रॉवरमध्ये असे सुरू होते. त्यावेळी माझी मैत्रीण घरी आली आणि म्हणाली , “अगं ! या युज अँड थ्रोच्या दुनियेत हे काय करत बसलीस?” तिला माझ्या वस्तू टिकवण्याच्या कॅपॅसिटीचे नेहमीच कौतुक वाटते. माझ्या कपबशा , घरातील बारीकसारीक वस्तू खूपच टिकतात. त्यामुळे त्या फेकायची इच्छा होत नाही आणि गरजही पडत नाही. घरातील सर्व बरण्या, दगड्या यांच्यामध्येही माझा असाच जीव असतो. मी त्यांना खूप जपते.

थोड्या वेळाने चहा पिऊन मैत्रीण घरी गेली . मात्र तिच्या शब्दाने ‘युज अँड थ्रो’ शब्दाने माझ्या मनात घर केले. आजकाल वस्तूंचा वापर करून लगेच टाकून देण्याकडे कल आहे .तशा प्रकारच्या विशेष वस्तूही मिळतात. त्यामुळे वस्तूंचा साठा घरांमध्ये करून ठेवला जात नाही. छोट्या घरांमध्ये आवश्यकही आहे. पण माझ्या मनात आलं की आज वस्तू खूप जमवल्या जातात, घर प्रत्येक वेळी नवीन येणाऱ्या आणि युनिक वस्तूंनी भरून त्याचं प्रदर्शन असल्यासारख्या मांडल्या असतात. आणि थोड्या जुन्या वाटू लागल्या की, लगेच नवीन ट्रेंड्स असलेल्या वस्तू घरात येतात. पण हेच आज माणसांबद्दलही होतं का? माणसांना केवळ वापरून नंतर दूर करण्याकडे किंवा फेकून देण्याकडे कल वाढला आहे का ?

अशी अनेक उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसून येतात. मध्यंतरी एक कथा वाचनात आली. त्यात एक व्यक्ती काडी काडी जमवून संसार जमवतात. त्यांची पत्नीही काटकसरीचीच असते. ओव्हर टाईम करून, आवडीनिवडी बाजूला ठेवून, हौस मौज न करता ते मुलांसाठी तरतूद करून ठेवतात .ऑफिसचे लोक वारंवार त्यांना सांगतात, साहेब पुढे मुलांचं कुणी पाहिलं? त्यांच्या बायका आल्या की ते तुमचं काही ऐकू शकणार नाहीत. पण त्या गृहस्थांचा त्यावर विश्वास बसत नाही. त्यांना मुलांबद्दल पूर्ण खात्री असते. माझ्या संस्कारात वाढलेली मुले अशी करू शकणार नाही.

पुढे ते निवृत्त होतात. मुले त्यांची एकसष्टी साजरी करतात .त्याच दिवशी रात्री ते आपल्या संपत्तीची वाटणी दोन मुलांमध्ये करून देतात. आता ते निर्धास्त ,समाधानी जीवन जगायला मोकळे होतात; पण दुसऱ्या दिवशीपासून त्या दोघांबाबत मुले व सुना यांची वागण्याची पद्धत बदलते. हीच का आपली मुले ?असा भ्रम त्यांच्या मनात निर्माण होतो. आणि त्यांना वारंवार आपल्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची आठवण येत राहते. खरं तर निवृत्तीच्या दिवशीही त्यांच्या सहकाऱ्यांनी परत याबाबत सूचना केली असते; पण तेही ती हसण्यावारी नेतात.

आज दिमाखदार वस्तूंना जोपासत माणसाचा मात्र वापर करून घेऊन फेकल्या जाते.

या पार्श्वभूमीवर एका जपानी तंत्राची मला आठवण झाली. किंत्सुकोराई ! याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत.

अशीच एक तेराव्या शतकातील कथा . एक सम्राट होऊन गेला आणि कारागिरांकडून एक सुंदर बाऊल तयार करून घेतला होता. तो त्याला खूप आवडायचा. एका समारंभात तो बाऊल फुटला सम्राटाला दुःख झालं . त्याच्या मुलांसह ,काही जणांनी रात्रभर प्रयत्न करून नव्या नक्षीकामासह तो जोडला. राजा खूप खूश झाला. नंतर अशा प्रकारे ही जोडणी करण्याची कला खूप प्रगत झाली. समस्या कथेकडे जर आपण बघितलं तर मानवी संबंधांचे प्रतीक म्हणून याकडे पाहता येईल. या बाऊलविषयी एक लेखक म्हणून लिहितो, “द बाऊल हेड बिकम मोर ब्युटिफुल फॉर हाविंग बिन ब्रोकन. द लाईफ ऑफ बाऊल बिगन् दी मोमेंट…. इट वॉज ड्रोपड !

किती समर्पक आहे हे! ही आहे एक वृत्ती ! जपानच्या संघटितपणाचे रहस्य ! तुटलेलंही नातं जोडायचं अशी ही वृत्ती प्रेम आणि संवेदनशीलता जिवंत ठेवणारी आहे. समाज जोडण्यासाठीची कलाच म्हणाना.

नेमके काय आहे हे किंत्सुकोराई ?
जपानी माणसाने क्रोकरी आणि पोटरी जोडण्याची एक कला प्राचीन काळीच शोधून काढली. त्याला किंत्सुकोराई म्हणतात. त्याचा शब्दासह अर्थ आहे सोन्याने जोडण्याचे तंत्र. अत्यंत सुंदर आकर्षक नक्षीकाम केलेली चिनीमातीची फुटलेली भांडी, सोने किंवा चांदीचे विशिष्ट प्रकारचे द्रावण करून जोडले जातात. नव्हे, नक्षीकाम खूप कौशल्याने केले जाते की, तुकड्यांचे जोडही आकर्षक दिसतात. आणि एखादा तुकडा हरवला असेल तर तो भाग सोन्याने भरला जातो . त्यामुळे ती वस्तू पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर आणि जास्त मौल्यवान बनते. प्राचीन अशी भांडी जपानच्या विविध संग्रहालयांत ठेवलेली आहेत;

पण वरच्या वर्णनाकडे बघितलं तर लक्षात येतं किती केवळ वस्तू जोडण्याची कला किंवा तंत्र नाहीये तर खरं म्हणजे ते एक तत्त्वज्ञान आहे.

आपण सगळीच माणसं आहोत. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, आवड वेगळी, मनोरचना वेगळी ! पण म्हणतात ना, तोडणे सोपे आहे पण जोडणे अवघड! आपण सारे अपूर्ण आहोत. त्यामुळे बरेचदा एखादा शब्द, एखादी कृती, समोरच्या माणसाला दुखवून जाते. आणि मग त्या जखमा भरायला वेळ लागतो . माणूस निराश आणि हैराण होतो. विश्वासाला तडे जातात. मने दुखावून कधी संताप, सुडाच्या भावना निर्माण होतात. जेवढं काही कमावलं असेल तेवढं एका शब्दाने, वाक्याने हरवले जाते. मग हे जोडले जाऊ शकते ? नक्कीच ! कसे ? याच जपानी तंत्राने !

काय करायचं यासाठी? तर व्यक्ती तिथे लिमिटेशन म्हणजेच परत unconditional acceptance. Let Go! करायला शिकणे. सोडून देणे. क्षमा करणे. त्यासाठी मोठे व्हायला शिकणे .

आणि मुख्य म्हणजे आपला चष्मा बदलणे. दृष्टिकोन बदलणे. अशा काही तंत्रांचा वापर करून आपण मूळचे नातेसंबंध तर जोडू शकतो; पण ते आणखीन घोटीव, नक्षीदार करू शकतो; कारण अग्नीतून बाहेर निघालेल्या सोन्याची झळाळी जास्त असते. नात्यांचेही तसेच असते . फक्त त्यावर नात्यांची किंत्सुकोराई करायला हवी.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER