ठाकरे सरकारच्या अपयशामुळे मराठा समाजावर आंदोलनाची वेळ – रावसाहेब दानवे

Uddhav Thackeray

मुंबई : मराठा समाजाला आरक्षणासाठी आंदोलनाची वेळ ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळे आली आहे. त्यांनी वेळीच दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती. पण ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमुळेच आज मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) केला आहे.

ही आंदोलन करण्याची वेळ फक्त ठाकरे सरकारच्या अपयशामुळे मराठा समाजावर आली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली हे या सरकारचं अपयश आहे. सरकारने योग्य पद्धतीने आपली बाजू मांडली असती तर स्थगिती मिळाली नसती असा आरोप त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. तामिळनाडू सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने तेथील आरक्षणाचा मुद्दाही सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं आरक्षण प्रकरण पूर्ण पीठाकडे पाठवलं. दुसऱ्या बाजूला ठाकरे सरकारने आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर योग्य रीतीने बाजू मांडण्याची गरज होती. ते ठाकरे सरकारने केलं गेलं नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

दोन्ही राज्यांची तुलना केली तर तामिळनाडूचं सरकार यशस्वी ठरलं आणि ठाकरे सरकार आरक्षणाच्या मुद्यावर अपयशी ठरतं. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, असं झालं तरच मराठा समाज शांत होईल अन्यथा ठाकरे सरकारला या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.

मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. यानंतर ठाकरे सरकारवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. मात्र आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईत त्यांना साथ देणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. तसंच कॅबिनेटच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा विषय समोर आला तेव्हा मराठा समाजाचे विद्यार्थी आणि तरुण यांच्यासाठी काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले होते. दरम्यान आज रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केली. सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली असती तर आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाली नसती असंही त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER