अजूनही वेळ गेली नाही, हिंदुत्वाच्या आधारावरील युती अबाधित राहावी : नितीन गडकरी

Nitin-Gadkari

मुंबई :अजूनही वेळ गेली नसून युती अबाधित राहावी, असे आम्हाला वाटत असून हिंदुत्वाच्या आधारावर झालेली शिवसेना-भाजपची आजवरची सर्वांत  मोठी युती असल्याचे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ज्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी युतीचे राजकारण केले. आजही आमची युती त्याच आधारावर टिकून आहे.

 त्यामुळे शिवसेना युती तोडण्याचं काम करणार नाही. मात्र, शेवटी त्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे.  त्यामुळे त्यांना कोणासोबत जायचे हा त्यांचा निर्णय असल्याचे गडकरी म्हणाले. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की,

ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री होईल. त्यानुसार आता महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक १०५ आमदार आहेत.  शिवसेनेच्या दाव्यानुसार, आम्ही पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून त्यावर त्यांनी आम्हाला सांगितले की, लोकसभेच्या वेळी अशा प्रकारचा विषय शिवसेनेने आमच्यासमोर ठेवला होता. मात्र विधानसभेच्या वेळी याबाबत चर्चा करू, असे आम्ही त्यांना सांगितले. त्याबाबत शिवसेनेला आम्ही कुठलेही वचन दिले नसल्याचे शहा यांनी सांगितल्याचे गडकरी यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : आमची खंत दूर होणार असेल तर, सेनेसाठी चर्चेची दारं खुली – फडणवीस

शिवसेनेच्या मंत्रिपदाबाबत किंवा वाट्याबाबत चर्चा करता आली असती. मात्र, निकालानंतर आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे म्हणणे म्हणजे युतीला काही अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

गडकरी म्हणाले, मला विश्वास आहे, भाजपा-सेनेचे सरकार स्थापन होईल.  गरज पडल्यास मी यामध्ये मध्यस्थी करेन. हिंदुत्वाच्या आधारावर असलेली ही युती अबाधित राहायला हवी, अशी इच्छाही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केली.