… तोपर्यंत पंचनामे होणार नाही : अब्दुल सत्तार

abdul sattar

जालना : हवामान खाते जोपर्यंत सगळे संपले (म्हणजे पावसाची शक्यता नाही) असे सांगत नाही तो पर्यंत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत, असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सांगितले.

प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणालेत, आतापर्यंत तीनवेळा पंचनामे करण्यात आले. आता जोपर्यंत हवामान खाते आता सगळे संपले असे सांगत नाही तोपर्यंत पंचनामे होणार नाहीत. एकदा पंचनामे झाले की शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करू.

राज्यातील ज्या भागात पावसामुळे जास्त नुकसान झाले आहे त्या भागातील महसूल वसुली थांबवण्याचे आदेश देणार येतील. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळणारच आहे. गरज असल्यास कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करू, असे सत्तार म्हणालेत.

विरोधक ज्या ताकदीने राज्य सरकारवर टीका करत आहेत तेवढीच ताकद त्यांनी केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, असा टोमणा त्यांनी विरोधी पक्षांना मारला. विरोधकांनी राज्याची आर्थिक स्थिती खराब करून ठेवली आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी मंत्री दौरे करत आहेत. विरोधकांनी केंद्रात वजन वापरून महाराष्ट्राला मदत करायला हवी. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात विरोधकांचाही सिंहाचा वाटा असायला हवा, असे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER