टिक टॉक गर्ल ते नायिका

Sonali Patil

सोशल मीडिया (Social Media) हे माध्यम आता प्रत्येकाच्या हातात आहे. वेगवेगळे व्हिडिओज बनवणे हा अनेकांचा छंद आहे पण हा छंद जोपासता जोपासता आवडत्या क्षेत्रात करिअर करायला मिळण्याची संधी मिळाली तर हा विचार किती भन्नाट आहे ना ! वैजू नंबर वन या मालिकेची नायिका म्हणजेच सोनाली पाटील  (Sonali Patil)हिला देखील ही भूमिका मिळाली ती तिने केलेल्या टिक टॉक व्हिडिओमधून. आता जरी टिकटॉक हे ॲप बंद झाले असले तरी जेव्हा टिक टॉक ॲप सुरू होतं तेव्हा सोनालीने खूप सारे टिकटॉक व्हिडिओ बनवले होते. इतकेच नव्हे तर सोशल मीडिया वर्तुळामध्ये सोनालीला (Sonali) टिक टॉक गर्ल म्हणून ओळखले जात होते.हीच टिक टॉक गर्ल आता एका मालिकेची नायिका मधून सेलिब्रिटी वर्तुळात झळकत आहे. सहज म्हणून केलेल्या त्या टिकटॉक (Tik tok) व्हिडिओमुळे आपल्याला एका मालिकेची नायिका म्हणून ऑफर येईल हा विचार सोनालीनेही केला नव्हता. पण हे घडून आले आणि आता ती तिच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करत आहे.

आपल्या घरातीलच नव्हे तर कोणतीही समस्या हुशारीने आणि चुटकीसरशी सोडवणारी एखादी स्त्री आपल्या आसपास असते. अशा स्त्रीची व्यक्तिरेखा म्हणजेच वैजू नंबर वन ही भूमिका सध्या सोनाली करत आहे. या भूमिकेसाठी असणारा उत्साहीपणा सोनालीने तिच्या अभिनयातून उत्तम साकारला आहे. त्यामुळे ही मालिका आणि या मालिकेतील चाळीतली सगळी पात्र तुफान लोकप्रिय झाली आहेत .

सोनाली सांगते, खरे तर वैजू नंबर वन ही मालिका करत असताना या कथेमध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टी आहेत किंवा समस्या सोडवण्यासाठी सतत इतरांच्या उपयोगी येणाऱ्या स्त्रिया मी माझ्या आयुष्यामध्ये खूप पाहिल्या आहेत. त्यामुळे ही मालिका प्रत्येकाला वास्तववादी वाटते. कारण अशा स्त्रिया आणि अशा व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला सतत दिसतात. एखादी मालिका हिट का होते ? जेव्हा त्या मालिकेची कथा, मालिकेतील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना जवळच्या वाटतात. अभिनयात करिअर करायचं असं मी काहीच ठरवलं नव्हतं. कोल्हापुरात राजाराम कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं त्यानंतर मी बी. एड. केलं. मला शिक्षिका व्हायचं होतं. हे क्षेत्र मला खूप आवडायचं. लहानपणी खेळताना सुद्धा मी शिक्षिका आणि विद्यार्थी असे खेळ खेळायचे आणि त्यामध्ये मी शिक्षिका व्हायचे. मला शिक्षिका वर्गात येते आणि विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणतात आणि मग ती सगळ्यांना शिकवायला सुरु करते हे खूप आवडायचं. मी ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या राजाराम कॉलेजमध्ये मला ज्युनियर कॉलेजची शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली हा अनुभव माझ्यासाठी खूपच वेगळा होता. ज्या ठिकाणी आपण शिकलो, ज्या वर्गात मी स्वतः बसत होते, ज्या बेंचवर मी स्वतः बसत होते, त्या वर्गात मी शिक्षिका म्हणून शिकवायला आले तेव्हा खूप आनंद झाला .एखाद्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून आपण धमाल करणं ,मजा करणं आणि त्याच कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करत असताना जबाबदारीने वागणं या दोन्ही गोष्टींचा अनुभव मी घेतला आणि हा माझ्या आयुष्यातील हा भाग खूप वेगळा आहे. दरम्यान जुळता जुळता जुळतंय की या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूर परिसरात होणार होतं आणि माझ्या काही मित्रमंडळीनी मला या मालिकेत एक भूमिका आहे असं सुचवलं. सहज म्हणून मी ऑडिशन दिली आणि या मालिकेतील रेखा या व्यक्तिरेखेसाठी माझी निवड झाली. प्राध्यापिकेचा जॉब आणि रेखाची भूमिका या दोन्ही मी त्या वेळेला करत होते. पण त्यानंतर मला टीक टॉकचे व्हिडिओ करायला खूप आवडायला लागलं. सणाच्या निमित्ताने मी सजायचे तेव्हा मी ते व्हिडिओ बनवून टिक टॉक वर अपलोड करायचे किंवा काही असे मजेशीर व्हिडिओ बनवण्याचं मला सुचलं की मी लगेच ते बनवून टिक टॉक वर टाकायचे. यामुळे मी टिकटॉकवर खूप प्रसिद्ध झाले. मला वैजू नंबर वन या मालिकेची ऑफर आली. सहज केलेले व्हिडिओ आज मला एक ओळख देऊन गेले. एक चेहरा देऊन गेले.

जुळता जुळता जुळतंय की ही सोनालीची पहिली मालिका होती तर वैजू नंबर वन या तिच्या दुसऱ्याच मालिकेत थेट नायिका साकारण्याची संधी मिळाली. सध्या तरी या मालिकेत व्यस्त आहे. तिला मराठी सिनेमात काम करायचा आहे शिवाय वेब सिरीज मध्ये झळकण्याची सोनालीची इच्छा आहे. अवघ्या पाच वर्षात सोनालीने मनोरंजन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER