टायगर श्रॉफचा ‘हीरोपंती 2’ डिसेंबरमध्ये होणार रिलीज

Tiger Shroff

टायगर श्रॉफने (Tiger Shroff) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अ‌ॅक्शनपॅक्ड हीरो म्हणून तर तो त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे शोभतोच. पण बलदंड शरीरयष्टी असली तरी तो प्रचंड लवचिकही आहे. आणि त्यामुळेच बॉलिवूडमध्ये तो एक उत्कृष्ट डांसर म्हणूनही ओळखला जातो. यंदाच्या वर्षी सगळ्या मोठ्या हीरोंनी त्यांच्या सिनेमासाठी तारखा बुक केल्या. टायगर श्रॉफनेही त्याच्या ‘बागी 4’ आणि ‘गणपत’ या दोन सिनेमांसाठी बॉक्स ऑफिस बुक करून टाकले होते. आता त्याने त्याच्या तिसऱ्या सिनेमाच्या रिलीजचीही घोषणा केली आहे.

टायगर श्रॉफने सोशल मीडियावर त्याच्या हीरोपंती 2 या सिनेमाचे पोस्टर शेअर करीत रिलीजची तारीखही जाहीर केली असून टायगरचा हा अ‌ॅक्शनपॅक्ड सिनेमा 3 डिसेंबर 2021 रोजी देशभरात रिलीज केला जाणार आहे. या पोस्टरसोबत टायगरने सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करीत आनंदही व्यक्त केला आहे. पोस्टमध्ये टायगर म्हणतो, ‘माझे पहिले प्रेम परत आले आहे. अशी अ‌ॅक्सन, रोमांच तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेली नसेल. या, थिएटरमध्ये 3 डिसेंबर रोजी एकत्र जमून आनंद साजरा करूया.’ ’हीरोपंती 2’ चे दिग्दर्शन अहमद खानने केले आहे. अहमद खानने यापूर्वी टायगर श्रॉफसोबत ‘बागी 2’ आणि ‘बागी 3’ हे सिनेमे केलेले आहेत. हीरोपंती 2 ची निर्मिती साजिद नाडियाडवाला करीत आहे.

टायगरसाठी ‘हिरोपंती 2’ सिनेमा खूपच खास आहे. याचे कारण म्हणजे 2014 मध्ये टायगरने ‘हीरोपंती’ सिनेमातूनच बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता आणि आता सात वर्षानंतर त्याची फ्रेंचाईजी तयार होत आहे. ‘हीरोपंती 2’ची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती आणि गेल्या वर्षीच हा सिनेमा रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. सिनेमाचे गेल्या डिसेंबरमध्ये पुन्हा शूटिंग सुरु करण्यात आले होते. बॉक्स ऑफिसवर टायगरचा शेवटचा चित्रपट ‘बागी 3’ गेल्या वर्षी 6 मार्च रोजी रिलीज झाला होता. कोरोनामुळे थिएटर बंद पडले आणि सिनेमाचे मोठे नुकसान झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER